पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मामाना नेहमी खंत वाटे. गरीबीमुळे रुपया दीडरुपया फी परवडत नाही म्हणून मामाना इंग्रजी शाळा सोडून मराठी शाळेत नाव घालायला लागले. त्यावेळी मराठी ७ वी म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल. ती पास झाल्यावर सांगली संस्थानच्या अखत्यारीत नोकरी मिळण्याची शक्यता असे. पण तसा काही प्रकार घडला नाही. अलट सहज म्हणून मामानी ड्रॉइंगच्या दोन परीक्षा दिल्या. त्याचा त्याना अत्तर आयुष्यात खूप अपयोग झाला.
 घरातील बिकट आर्थिक परिस्थिती, पैशावरुन आई-वडिलांची एकसारखी होणारी भांडणं, या गोष्टीना वैतागून मामानी शाळा सोडली. घरात मदत व्हावी म्हणून मामानी साईन बोर्ड्स रंगवणे, घरांना रंग देणे अशी कामे करणाऱ्यांकडे सहाय्यकाची नोकरी पत्करली. त्यामुळेच त्यांची सांगलीतील सुप्रसिद्ध पेंटर शंकरराव गायकवाड यांच्याशी ओळख झाली. सांगलीच्या 'सदासुख' थिअटरमध्ये प्रयोग असणाऱ्या नाटकांचे पडदे गायकवाड रंगवीत तेव्हा मदतनीस म्हणून मामा त्यांचेबरोबर काम करीत. या अनुभवाचा मामाना पुढे फार अपयोग झाला.
 १९२४ च्या सुमारास सुप्रसिद्ध किर्लोस्कर संगीत मंडळी शेवटची घटका मोजत होती. 'ललित कलादर्श' संगीत मंडळींचे मालक बापूसाहेब पेंढारकर आणि नानासाहेब चाफेकर यांच्यात बखेडा माजल्यावर, चाफेकरानी ही किर्लोस्कर मंडळी चालवायला घेतली. कंपनीचा मुक्काम सांगलीत असताना चाफेकरानी शंकरराव गायकवाडांचं कामं बघितलं होतं. त्यानी गायकवाडाना आपल्या कंपनीबरोबर नेले; कंपनीची कामं हुबळीत चालली होती तेव्हा पडदे रंगविण्याची कामे शंकररावाना भारी पडू लागली. एखाद्या मदतनीसाची त्याना आवश्यकता वाटू लागली. तेव्हा त्याना मामांची आठवण झाली. चाफेकरांच्या संमतीने त्यानी मामांना पत्र टाकून बोलावून घेतलं. घरची मंडळी राजी नसतानासुध्दा नाटक कंपनीत जाण्याचा मामांनी निश्चय केला. वडिलानी सांगितलं की, "जातोस तर जा. पण व्यसन लावून घेऊ नकोस.” नाटक मंडळींविषयी एकूण मत, समाजात त्याकाळी काय असे, त्याची ही झलक.
 पडत्या फळाची आज्ञा घेऊन मामा सांगलीजवळच्या बुधगाव स्टेशनवर (जुनं माधवनगर स्टेशन) मध्यरात्रीच्या वेळी ३-४ मैल चालत गेले. दुसऱ्या दिवशी हुबळीला पोचले. शोधत शोधत कंपनीच्या मुक्कामी गेले. शंकररावांना पडदे रंगवण्याच्या कामात मदत करणे, स्टेज झाडणे, नाटकाच्या सामानाची, प्रयोगाच्या वेळी मांडामांड करणे अशा कामांबद्दल त्यांचा पगार ठरला होता, दरमहा घसघशीत आठ रुपये!

 नाटक-मंडळीतील मामांची पहिली 'एन्ट्री' अशी होती! रंगभूमीची ओढ


सांगली आणि सांगलीकर............................................................... . १४२