पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोजी झाला. त्यांचे मूळ नाव चिंतामण गोविंद पेंडसे. त्या नावाचं “मामा पेंडसे" हे बारसं अगदी अकल्पितपणे झालं.
 त्याचं असं झालं. श्री समर्थ नाटक मंडळींचे "मराठ्यांचे सिंहासन" या नाटकाचे गावोगावी प्रयोग चालू होते. 'येवले' या गावी प्रयोग होता. चिंतामण गोविंद पेंडसे त्या नाटकात होते. त्यांचा सांगलीचा एक मित्र, गुरुनाथ पांडुरंग कुलकर्णी तिथे रेल्वेत नोकरीला होता. आपल्या सांगलीच्या मित्राचे नाटक म्हणून तो कौतुकाने पहावयास आला होता. त्याच्याबरोबर त्यांचे एक वकील मित्र होते. त्या नाटकातील पेंडशांचं काम वकीलसाहेबाना फार आवडले. म्हणून त्यानी तसे नंतर पत्राने कळविले. पत्रात मायना लिहिताना त्याना पेंडशांचे नाव आठवेना; म्हणून त्यानी नाटक कंपनीतील एक दोन पोरांना नावाबद्दल विचारले. नाटकात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या नटांना कंपनीची मुलं, आदराने तात्या, दादा अशा नावाने संबोधित असत. कंपनीतील सीतारामपंताना 'बापू' म्हणत, दत्तोपंत वैशंपायन याना 'नाना' म्हणत. तसेच कोणी दादा होते, तात्या होते. मामा कुणीच नव्हते. म्हणून वकील मित्रानी विचारल्यावर त्यानी पेंडशांचं नाव ‘मामा' आहे असे ठोकून दिले! वकिलानी कौतुकाने लिहिलेल्या पत्रात 'चिंतामण गोविंद पेंडसे' यांचा मामा पेंडसे असा अल्लेख केला आणि त्यांच्या कामाची खूप स्तुती केली. पत्र कंपनीच्या बिऱ्हाडी आल्यावर “मामा पेंडसे, मामा पेंडसे” असा सर्वत्र पुकारा चालू झाला. पेंडसे, 'मामा' म्हटल्यावर चिडतात हे बघून मुद्दामच सर्वजण चिडवू लागले.
 तेव्हापासून पेंडशाना अजिबात न आवडणारी “मामा” ही अपाधी त्याना कायमचीच चिकटली.

 मामांचं बालपण फार गरीबीत गेलं. त्यांचे वडील गोविंदराव तत्कालीन सांगली संस्थानात नोकरीला होते. त्यांची पहिली बायको निवर्तली. त्यानंतर बरीच वर्षे त्यानी लग्न केलं नाही आणि दुसरं लग्न केलं ते वयाच्या ४५ व्या वर्षी. ते सुद्धा लहान वयाच्या मुलीशी. मामांच्या आईचे वय लग्नाच्यावेळी फक्त ११ वर्षाचे होते. अर्थात् त्या काळी अशी लग्ने सर्रास होत. लहान वयात मामांच्या आईची दहा बाळंतपणे झाली. त्यांची आई मुळातच थोडी तापट स्वभावाची. परिस्थिती हलाखीची. नवरा-बायकोच्या वयातील विषम अंतर. त्यामुळे मामांची आई सदैव गांजलेली असे. कातावलेली असे. परिणामी मामांना आईचे प्रेम म्हणून कधी मिळालचं नाही असं खुद्द मामानीच नमूद करुन ठेवलय. लहानपणी तर नाहीच नाही पण पुढे परिस्थिती पालटली. मामाना नाट्यक्षेत्रात नाव मिळालं. सत्कार झाले. तेव्हापण आईच्या तोंडून त्याना कधी कौतुकाची पावती मिळाली नाही. ह्या वस्तुस्थितीची


सांगली आणि सांगलीकर.................................................................. . १४१