पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नटवर्य मामा पेंडसे



 १९५४ सालच्या जूनमधली गोष्ट. रंगभूमीवरील एक नटश्रेष्ठ आपल्या नेहमीच्या पोटदुखीच्या व्यथेने जर्जर झाले होते. १९ जूनला तर दुखणे विकोपाला जाऊन रात्रीत १०-११ रक्ताच्या अलट्या झाल्या. आधी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे २० जूनला त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता. त्यांची स्वत:ची अिच्छा, अर्थातच त्या प्रयोगात काम करण्याची होती. रंगभूमीवर चेहऱ्यावर भूमिकेचा मेक-अप चढवून एकदा अभं राहिलं की आजार पळून जाईल असं त्याना वाटे. पण घरच्या मंडळींचा आग्रह - मानून ते कुर्ल्यातील आपल्या घरातून टॅक्सीने हॉस्पिटलमध्ये निघाले. प्रयोग होता दुपारी परळच्या दामोदर हॉलमध्ये. टॅक्सी वाटेत थांबली ती डॉ. अजित फडके यांच्या माटुंग्याच्या हॉस्पिटलसमोर. डॉ.नी एकंदर रागरंग बघितला आणि नटवर्यांना एकदम अॅड़मिटच करुन टाकले! आजार गंभीर होता. तब्बल पाच महिने बेडवर पडून राहायला लागलं.
 गंमत म्हणजे हॉस्पिटलच्या बेडवर असतानाच, त्यांच्या एका हातखंडा नाटकाचा प्रयोग लागला. त्यामुळे निर्मात्याने त्याना सहज विचारलं. त्या नटश्रेष्ठाला राहवेना. त्याने डॉक्टराना गयांवया करुन परवानगी मागितली. त्यांची तडफड पाहून डॉक्टरानी अखेरीस विनंती मान्य केली. जवळच माटुंग्याच्या किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये नाटकाचा प्रयोग होता.
 नटवर्यानी प्रयोगात काम केले आणि नंतर तडक हॉस्पिटलमध्ये जाऊन ते समाधानाने आपल्या बेडवर पडले!
 रंगभूमीवर नितांत निष्ठा असणाऱ्या त्या नटश्रेष्ठाचं नाव होतं, “मामा पेंडसे.”
 आपल्या भेदक डोळ्यांनी आणि पल्लेदार आवाजाने मराठी नाट्यरसिकांवर मोहिनी घालणाऱ्या मामाना आयुष्यभर पोटदुखीच्या या व्याधीनं छळलं. पाच-सहा वेळा त्यांची ऑपरेशन्स झाली. त्यांची नाटकं आणि हॉस्पिटल्सच्या वाऱ्या यांचा मेळ घालताना, सुप्रसिद्ध विनोदी नट शंकर घाणेकर गमतीने म्हणायचे "मामा एक तर हॉस्पिटलच्या थिअटरमध्ये असतात नाहीतर नाटकाच्या थिअटरमध्ये असतात."

 मामा पेंडसे हे मूळचे सांगलीकर. त्यांचा जन्म सांगलीला २८ ऑगस्ट १९०६


सांगली आणि सांगलीकर................................................................... १४०