पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दर्शन मला घडलं, ते प्रथमतः सांगलीत. गणपतीच्या घाटावर बसून, पश्चिमेकडला मावळता सूर्य, मी डोळे भरुन प्रथम सांगलीतच पाहिला. हरद्वारच्या गंगेच्या विशाल पात्राप्रमाणे, चराचर सृष्टीभर पसरलेल्या चांदण्याच्या सुंदर प्रवाहानं मला मंत्रमुग्ध करुन सोडलं, ते याच परिसरात. कोजागरी पौर्णिमा दर वर्षी येते. पण कोजागरी म्हटलं की मला आठवण होते, ती लहानपणी अश्विन पौर्णिमेदिवशी पाण्यातून माशानं पोहावं, त्याप्रमाणे चांदण्यातून आमराईकडे गेल्याची. गाण्यातल्या सप्तसुरांप्रमाणे वाटणारे इंद्रधनुष्याचे सात रंग मी पुनःपुन्हा पाहिले, ते माझ्या या जन्मभूमीत. गणपतीच्या देवळाच्या अंच तटाला वळसा घालून पांजरपोळाकडे जाताना जी गर्द झाडं लागत, त्यातल्या एका झाडातून कानांवर पडलेला मधुबोल- आणि तो ऐकताच सारं भान विसरुन आपल्याला शाळेला जायचंय्, याचाही विसर पडून वेड्यासारखा अभा राहिलेला मी - या गोष्टी अजून माझ्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. कवीला प्रिय असणाऱ्या या सुंदर गोष्टींच्या जोडीनं व्यावहारिक वाटणाऱ्या माणसांची क्षुधा शांत करणाऱ्या वस्तूंचं सौदर्य प्रथमतः भेटलं, ते इथंच. इवल्या इवल्या लहान वांग्यांचा काळा कुळकुळीत किंवा जांभळा रंग, शेतातून नुकत्याच आलेल्या काकड्यांचा लुसलुशीतपणा, मक्याच्या कणसांतले मोत्यांचे दाणे, जमिनीत लपून बसलेल्या भुईमुगाच्या शेंगांची गोडी, संध्यारंगाला लाजविणाऱ्या पाडाला आलेल्या आंब्याचा रंग- अशा किती गोष्टी सांगाव्यात? माणसाचं सृष्टीशी असलेलं निकटंच नातं नकळत माझ्या मनात ठसवलं, ते सांगली - जिच्या काठावर वसली आहे, त्या कृष्णामाईनं. मी दहा-बारा वर्षांचा झाल्यापासून पुढे अनेकदा एकटाच कृष्णेच्या काठावर जाऊन बसलो आहे. तिथल्या शीतल वायुलहरीनी मनाचा दाह शांत केला आहे......मी सांगली सोडून गेलो तरी कृष्णेशी असलेलं माझं हे घरगुती नातं माझं अंतर्मन कधी विसरलं नाही. "
 सांगलीच्या भूमीशी एवढी मानसिक एकतानता साधणाऱ्या ह्या महान लेखकाचा, सांगलीच्या सुपुत्राचा, सांगलीकराना सदैव अभिमानच वाटेल !.

●●●

सांगली आणि सांगलीकर................................................................. . १३९