पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले. त्याना अदंड लोकप्रियता मिळाली. १९४१ साली त्याना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले. नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, साहित्य अकादमीचे फेलो, असे अनेक मानसन्मान त्याना लाभले. सर्वात कळस म्हणजे १९७४ मध्ये त्यांच्या 'ययाति' कादंबरीला एक लाख रुपयाच्या 'ज्ञानपीठ' पारितोषिकाचा, सर्वमान्य गौरवाचा पुरस्कार मिळाला.
 खांडेकराना मिळालेले विविध मानमरातब, त्यांची एकूण ग्रंथसंपदा याची मराठी वाचकाला आता साद्यन्त माहिती झाली आहे, विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या जन्मशताब्दीमुळे. पण लेखक म्हणून त्यांची मानसिक जडणघडण या सांगलीनेच केली, अशी नोंद खुद्द खांडेकरानीच आपल्या लेखनात अनेकवार केलेली आहे. सांगलीत बालपणात अनुभवलेल्या, ऐकलेल्या आणि प्रत्यक्ष बघितलेल्या अनेक प्रसंगानी, धार्मिक रुढी आणि परंपरा यांच्या चौकटीत ठाकून ठोकून बसविलेल्या सांगलीच्या वातावरणानं, विचारानं त्याना बंडखोर बनवलं, तसंच त्यांच्या मनात काही जीवनमूल्यांविषयी श्रद्धा निर्माण करण्याचं कामहि सांगलीनेच केले. खांडेकरांनी स्वतःच म्हटलय की “सांगलीनंच मला रामायण-महाभारतातल्या भारतीय संस्कृतीचा अभिमानी बनवलं आणि सांगलीनंच मला त्या काळी अल्पमतात असणाऱ्या सुधारक मतांकडे खेचून नेलं.” सांगलीच्या संस्कारक्षम वयात गोपाळशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुद्गलमास्तर यासारख्यांच्यामुळे मराठी भाषेची मनोमन जोपासना झाली; आयुष्यात काहीतरी चांगलं करावं, चांगलं बनावं अशी अर्मी मनात निर्माण झाली. रामभाऊ जोशी, बुवासाहेब गोसावी, जंबुअण्णा आरवाडे यासारखे काळजी वाहाणारे सन्मित्र, डॉ. देवांसारखा निरपेक्ष समाजसेवा करणारा देवमाणूस, प्रतिकूल परिस्थितीतह हसतमुख राहू शकणारे बाबाकाका ही माणसं त्याना सांगलीतच मिळाली. त्यांच्या सहवासाचा खांडेकरांच्या मानसिक जडण-घडणीवर दूरगामी परिणाम झाला.
 यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे खांडेकरांच्या ललित लेखनाला पोषक अशी सौंदर्यदृष्टी, चिंतनशीलता, निसर्गाचं प्रेम, त्याना सांगलीतच मिळालं. सांगलीच्या या आयुष्यभर पुरणाऱ्या संस्कारधनाबद्दल आपल्या आत्मवृत्तात त्यानी जे लिहलंय ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. 'एका पानाची कहाणी' मध्ये त्यानी म्हटलय.

 "सांगलीत माझ्या आयुष्याची पहिली सोळा वर्ष गेली. 'मनि नव्हती कशाची चिंता । आनंद अखंडित होता' असे शारदा बालपणाविषयी म्हणते. माझं बालपण तसं निश्चिंत किंवा आनंदपूर्ण नव्हतं. असं असूनही सांगलीच्या ज्या स्मृती माझ्या मनात राहिल्या आहेत, त्या साया आनंददायक आहेत. मानवी जगाचा मी एक सामान्यांतला सामान्य असा घटक, पण हे मानवी जग विशाल विश्वाच्या भव्य मंदिरातलं एक लहानसं दालन आहे. त्या विश्वाचं कुतूहलजनक अति-आनंदप्रद


सांगली आणि सांगलीकर................................................................... .१३८