पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यामुळे खांडेकरांच्या अभ्यासात थोडी ढिलाई आलीच.
 आणि अशा परिस्थितीतहि २२ डिसेंबर १९१३ रोजी जेव्हा मॅट्रिकचा निकाल लागला, तेव्हा मुंबई विश्वविद्यालयात त्यांचा आठवा नंबर आला; अगदी थोड्या मार्कानी त्यांचं इतिहासाचं पारितोषिक हुकले. एवढ्या घवघवीत यशामुळे, सर्वांची खांडेकरांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. नोकरीला चिकटवावं म्हणणारी मंडळी, या हुशार मुलाला कॉलेजात पाठवावं, अशी भाषा करु लागली! खुद्द खांडेकराना पण आपण अवांतर वाचनात फार काळ घालवला याची टोचणी लागली. कदाचित आजारी, अपंग अवस्थेतील वडील हयात असते, तर याहून अधिक यश आपण मिळवल असतं असंहि त्याना वाटून गेलं असेल! त्यांच्या तीन सख्खे व सहा चुलत अशा नऊ मामांनी मिळून अत्साहाच्या भरात खांडेकराना पुण्याला फर्ग्युसनला पुढील कॉलेजशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरवले.
 त्याप्रमाणे १९१४ सालच्या प्रारंभी पुण्यास जाण्याकरता खांडेकरानी सांगली सोडली.
 आणि अिथपासून खांडेकरांचे सांगली वास्तव्य खऱ्या अर्थाने संपुष्टात आले. सांगलीला आजोळ होतं. सांगली सांस्कृतिक केंद्र होतं. सांगलीत त्यांचे मित्रमंडळ होतं. चहाते होते. या सर्व कारणांनी त्यांचे सांगलीत येणं-जाणं राहिलं. पण १९१४ पासून त्यांचं सांगलीकर म्हणून वास्तव्य होते ते संपले.

 पुण्यात ते कॉलेजशिक्षणासाठी दीड दोन वर्षे राहिले. पण त्यांची आर्थिक परवड फार झाली. त्यामुळे त्याना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. अत्साहाच्या भरात ज्या नातेवाईकानी त्याना पुण्यास पाठवण्याचा घाट घातला, त्याना शेवटपर्यत आर्थिक मदतीचा नियमित ओघ चालू ठेवणं परवडलं नाही. मग सावंतवाडीच्या दूरच्या चुलत्याना दत्तक हवा होता म्हणून खांडेकराना दत्तक द्यायचे परस्पर ठरविले गेले. खांडेकरानाही भाबडेपणाने वाटले की दत्तक जाण्याने आपल्याला आर्थिक सुबत्ता लाभेल. शिक्षण पूर्ण करता येईल. घरच्याना चार पैसे पाठवता येतील. पण हे सर्व मनसुबे त्यांच्या दत्तक वडिलांच्या खास, 'सावकारी' पद्धतीच्या स्वभावधर्मामुळे, पार अधळले गेले. ध्येयवादी मनाच्या खांडेकरानी मग सावंतवाडीजवळच्या शिरोडा या खेडेगावात अठरा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. १९३८ नंतर ते कोल्हापूरला राहावयास आले, ते अखेरपर्यंत म्हणजे २ सप्टेंबर १९७६ रोजी मिरजेला त्यांचे देहावसान होईपर्यंत. या म्हणजे सांगली सोडल्यानंतरच्या काळात त्यानी विपुल लेखन केले. कथा, कादंबरी, लघुनिबंध, समीक्षात्मक, अनुवाद, संपादित अशी त्यांची प्रचंड ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या लेखनाने मराठी साहित्यात 'खांडेकर युग' सुरु


सांगली आणि सांगलीकर................................................................ १३७