पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आनंदाश्रू तरळले, त्यामुळे खांडेकराना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. असाच निर्मळ आनंद त्याना सदोदित द्यावा, म्हणून दुप्पट अत्साहाने खांडेकर अभ्यासाला लागले.
 पण सगळं काही मनासारखं घडलं तर ते जीवन कसलं ? विधिलिखित ही एक अगम्य गोष्ट आहे.
 डॉ. देवानी आपल्या मित्रासाठी वेचलेले अपार परिश्रम दैवाने मातीमोल ठरवले. ज्याना सुख व्हावे, आनंद वाटावा म्हणून खांडेकर सतत अभ्यासाच्या दावणीला, स्वतःला बांधून घेत होते, ते त्यांचे वडीलच देवाघरी गेले. खांडेकर पूर्णपणे खचून गेले.
 पण सुदैवाने वडिलांच्या माघारी आपण आपल्या कुटुंबाचा भार अचलला पाहिजे याची खांडेकरांना प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. याला कारण म्हणजे सत्तरी ओलांडलेले बाबाकाका. वडिलांच्या दुःखद निधनानंतर खांडेकरांचं सगळं कुटुंबच, आजोळी बाबाकाकांच्या आश्रयाला आलं होतं. बाबाकाका समाजात जरी बाबाशास्त्री माईणकर म्हणून मान्यवर असले तरी आर्थिक प्राप्ती तुटपुंजीच. त्यामुळे खांडेकरांचं कुटुंब त्यांच्या घरी आश्रयाला जाणं म्हणजे शिवरात्रीच्या घरी एकादशी असाच प्रकार होता! पण प्रेमळ मनाच्या, सर्वप्रकारच्या अडचणीतही सदैव हसतमुख राहणाऱ्या बाबाकाकानी सर्व जबाबदारी स्वीकारली. खांडेकरानी मात्र मनाशी खूणगाठ बांधली. लौकरात लौकर आपल्या पायावर अभं राहायचं आणि बाबाकाकांची व सर्वच आजोळच्या मंडळींची जबाबदारी कमी करायची. त्यानी अभ्यासाला नेटाने सुरुवात केली. तरीसुद्धा वडिलाना काही तरी करून दाखवायचंच, ही जी एक अर्मी होती, ती त्यांच्या निधनानंतर बरीचशी ओसरली ! त्यातच अभ्यासापोटी थोडा मागे पडलेला वाचनाचा नाद अफाळून वर आला. मिळेल ते पुस्तक वाचायचा सपाटा त्यानी सुरु केला. त्यांचे वकील असलेले मामा, विनायकराव माईणकर यांचं सांगली नगरवाचनालयात नाव होतं. त्यांच्या नावावर खांडेकर पुस्तकं आणू लागले. कथा, कादंबरी, नाटक जे काही हाताशी लागेल ते वाचायचे. शेळीला जसा कुठल्याही झाडाचा पाला चालतो तसं खांडेकरांचं झालं होतं ! सकाळचं पुस्तक संध्याकाळी परत करायचं, आणि संध्याकाळी घेतलेलं पुस्तक रात्री जागत वाचून दुसऱ्या सकाळी परत करायचं! अशा वाचनाच्या झपाट्यानं वाचनालयाचा कारकूनहि गडबडून गेला! पुस्तक वगैरे काही एक वाचत नाही. निव्वळ पुस्तकं शोधायला लावून आपल्याला छळणं एवढाच या मुलाचा हेतू आहे असं वाटण्यापर्यंत त्याची मजल गेली. !

 हे अतिवाचनाचं व्यसन आणि मॅट्रिक झाल्यावर पोस्टात वगैरे कुठंतरी याला 'चिटकवून' द्यावं, अशी आजोळच्या घरात चालणारी वडीलधारी मंडळींची भाषा,


सांगली आणि सांगलीकर.......................................................................... .१३६