पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खांडेकर सांगली हायस्कूलचे विद्यार्थी. त्यावेळी ही इंग्रजी शाळा राजवाड्यासमोरच्या आता कोर्ट भरते त्या जागी भरे, आणि नंतर आमराईजवळील, सुंदर अिमारतीत सांगली हायस्कूल आले. श्रीपादशास्त्री देवधर संस्कृत शिकवत. त्यानी नुसती भाषाच नाही शिकवली तर संस्कृत भाषेचे मर्म शिकवले. त्यानी शिकवलेले संस्कृत खांडेकराना आयुष्यभर पुरले पण त्याहिपेक्षा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला, तो शंकरशास्त्री केळकरांच्या मराठी शिकवण्याचा. त्यांच्या रसाळ वाणीमुळे खांडेकराना मराठी भाषेची गोडी लागली, अनिवार वाचनाची आवड लागली. त्यांच्या नकळत त्यांच्यात एक लेखक फुलत गेला.
 खांडेकरानी मनापासून अभ्यासाला सुरवात केली पण वडिलांच्या आजारपणामुळे बसणाऱ्या आर्थिक चटक्यांमुळे, त्यांचं कोवळं मन वेळोवेळी करपून जाई. पुस्तकं घ्यायला पैसे नसत. वेळच्या वेळी जेवण मिळणे फार कठीण गोष्ट बने. मग दूध प्यायला मिळणे दुरापास्तच. त्यामुळे त्यांनी अंग असे कधी धरलेच नाही. भरपेट जेवण मिळणे हा मोठा 'भाग्ययोग' असे.
 असा भाग्याचा दिवस कधी कधी खांडेकरांच्या आयुष्यात अगवे, तो त्यांच्या आजोबांमुळे - बाबाकाकांमुळे.
 बाबाकाका हे खांडेकरांचे आजोबा. त्यांच्या आईचे वडील. ते खांडेकरांच्या बालपणातच सत्तरीच्या घरात होते. तरीसुद्धा ते तेज:पुंज दिसत. गौरवर्णी हसतमुख आणि अतिशय प्रेमळ असे बाबाकाका, गणपती संस्थानचे पुराणिक होते. गणपतीमंदिरात पुराणिक म्हणून त्याना नित्यनैमित्तिक असे काम होते. गणपतीसंस्थानच्या सर्व सेवकांची मोफत जेवणाची व्यवस्था, त्या वेळी देवळाच्या आवारातच होत असे. बाबाकाकानी रात्रीचे जेवण सोडलं होतं. दुपारी काही कामगिरी निमित्तानं बाहेर गेलं, तर त्यांच्या बदली, गणपतीमंदिरात दुसरं कोणी जेवायला गेलं तरी चालत असे. अशी संधी कधी कधी खांडेकराना मिळे. मग बाबाकाकांऐवजी ते जेवून येत. मिळकत नसलेल्या घराचा तेवढाच भार कमी होई! आज या घटनेच्या आठवणीने सुद्धा ओशाळवाणे वाटते. पण खांडेकराना त्या काळात या जेवणाचं केवढं अप्रूप असेल? एक मात्र नुकसान व्हायचं. शाळेला जायला अशीर होई. पहिला तास हमखास बुडे. कारण गणपतीमंदिरातील जेवणाला घड्याळाचे बंधन नसे.

 अशा अडचणीतूनसुद्धा खांडेकर अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करत नसत. यामुळे इंग्रजी चौथीच्या परीक्षेत त्याना स्कॉलरशिप मिळाली. चक्क तीन रुपयांची ! जग जिंकल्याच्या आवेशात ते तीन बंदे रुपये घेऊन खांडेकर घरी आले. त्यावेळी व्याधिजर्जर असलेल्या वडिलांच्या मुद्रेवर जो आनंद पसरला आणि डोळ्यात जे


सांगली आणि सांगलीकर.................................................................... . १३५