पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हळूहळू सांगलीबद्दल नुसतं प्रेमच नव्हे तर सार्थ अभिमानही मनात नांदू लागला!

 तेव्हा या सांगली नगरीला भूषणभूत असणाऱ्या व्यक्तींविषयी एकत्रितपणे काही तरी लिहिलं जाणं आवश्यक आहे याची जाणीव सदैव टोचू लागली.

 सांगलीत आल्यावर तर हे काम किती कठिण आहे आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना आली. ज्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, हरिभाऊंच्या तोडीच्या आहेत आणि ज्यांचं शीघ्रकवित्व, रेंदाळकरांसारख्या अनेक मान्यवर कवींना संभ्रमात पाडे, असे कवी साधुदास, ज्यानी प्रपंच नेटका करुन, वकिलीचा व्यवसाय चरितार्थासाठी करुन, भक्तिमार्गाची कास धरली, आपल्या अमोघ कीर्तनाने हजारो श्रोत्यांना आनंद दिला, समाजप्रबोधन करुन सन्मार्गाला लावले, ते संतश्रेष्ठ कोटणीसमहाराज, चार आणे मजुरीवर काम करत करत, सचोटी, हातोटी आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या आधारावर, स्वतःची सुवर्णतुला करुन घेण्याइतकी स्वतःची अुन्नती करुन घेतली, ते सर्व सोने समाजाला दानरुपाने परत करुन विलक्षण दातृत्व दाखविले, स्वतःचा कारखाना, समाजकंटकांच्या कारवायांमुळे, डोळ्यासमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी मारून, सांगलीकर जनतेस अुद्यमशीलतेचा वस्तुपाठ घालून दिला ते श्रीगजानन मिल्सचे धनी दादासाहेब वेलणकर, पैलवान म्हणजे जाता-येता गुरगुरणारा शक्तिशाली पुरुष, या कल्पनेला छेद देणारे, आपल्या सात्त्विक आचरणाने जनमानसात स्वतःसाठी आदराचे स्थान निर्माण करणारे, कुस्तीचे शास्रशुद्ध शिक्षण नवशिक्या पैलवानांना मिळावं म्हणून धडपडणारे हरि नाना पवार, असे किती तरी सांगलीकर डोळ्यासमोर चमकून गेले.

 अशा अनेक सांगलीकरांविषयी लिहायला हवं होतं!

 त्यातून डोळयासमोर एक तांत्रिक प्रश्न होता. तो म्हणजे मुळात आधी 'सांगलीकर' म्हणून कोणास संबोधायचं? नुसता जन्म सांगलीचा आणि कर्तृत्त्व सांगलीबाहेर असणाऱ्याला 'सांगलीकर' समजायचे की जन्म बाहेरगावचा असूनहि सांगलीत कर्तृत्व गाजवून समाजात मान्यता पावलेल्या व्यक्तीला 'सांगलीकर' म्हणायचे?

 या प्रश्नाची मी अनेक मान्यवरांबरोबर चर्चा केली. पण

अकरा