पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विपन्नावस्था आल्यावर, कोंड्याचा मांडा करावा, टुकीने संसार करावा, रुग्णाईत नवऱ्याला धीर द्यावा, मुलाना माया द्यावी, त्यांच्या खाण्यापिण्याकडं बघावं, त्यांची फाटकी धोतरं, सदरे वेळच्या वेळी शिवावेत असलं तिला काही सुचतच नसे. कुणाचीच तिला माया नसे वा कुणाविषयी आस्था नसे. या तिच्या पराकोटीच्या अनास्थेपोटीच, कदाचित् खांडेकराना, आपल्या वडिलांची शुश्रुषा आपणच केली पाहिजे, हे कटू सत्य दहा-बारा वर्षाच्या कोवळ्या वयातसुद्धा, मनावर घट्टपणे ठसलं असावं. ती त्यानी मनापासून केली. त्यासाठी दिसतील त्या देवळांचे झुंबरे झिजवले. शनिमाहात्म्य वाचले. मनोमन नवस केले. डॉ. देवांची मदत होतीच.
 इंग्रजी तिसरीपर्यंत खांडेकरांचे शालेय जीवन सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच चालले होते. हूडपणा भरला होताच. सांगलीचा परिसर म्हणजे नाट्यपरिसर. विष्णुदास भाव्यानी लावलेले नाटकाचे रोपटे चांगलेच फोफावले होते. सांगलीचेच देवल- खाडिलकर, आता नाट्यसृष्टीत कीर्तीशिखरावर तळपत होते. त्यामुळे प्रत्येक सांगलीकर, नाट्यप्रेमी असायचाच, असा जणू विधिसंकेतच होता. मग खांडेकर तर काय ? प्रत्यक्ष नाट्याचार्य देवलांच्या समोरच त्यानी आपली 'नाट्यसेवा' शारदेच्या एकपात्री प्रयोगाने सादर केलेली! त्यातच त्यांच्या या नाट्यप्रेमाला त्यांचे मामेभाऊ बापूराव माईणकर, आणि एक दूरचे आप्त पंडित मास्तर, यांच्यामुळे आणखी खतपाणी मिळाले. कृष्णाकाठच्या घाटावर, खांडेकर आपल्या मित्रमंडळीसह नाटकांचे अखंड प्रयोग करीत.
 पण वडिलांच्या आजाराने या नाट्यप्रेमाला 'पडद्याआड' व्हावं लागलं . !
 तरीसुद्धा वडिलांसाठी 'शनिमाहात्म्य' वाचता वाचता एका अर्मीसरशी, खांडेकरानी त्यातील कथानकावर एक नाटक खरडले होतेच.
 पण शाळेतील एरवी कडक असणाऱ्या 'मुगल' मास्तरांमुळे आणखी एका वेगळ्याच अर्मीने जन्म घेतला.
 ती अर्मी होती स्कॉलर बनण्याची !
 शाळा चुकवण्यावरुन रागावताना मुदगल मास्तर म्हणाले होते "हे पाहा खांडेकर, तुझे वडील फार आजारी आहेत. अंथरुणाला खिळले आहेत. चांगला अभ्यास केलास, तुझा पहिला नंबर आला, तर त्याना किती बरं आनंद होईल ! स्वतःसाठी नाही तरी वडिलांसाठी, त्याना आनंद देण्यासाठी तरी तुला अभ्यास केलाच पाहिजे."

 हे मात्र खांडेकराना फार फार पटले. त्यानी मनापासून अभ्यासाला सुरुवात केली.


सांगली आणि सांगलीकर.............................................................................. . १३४