पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावंतवाडीला निघाले. त्या काळचा प्रवास म्हणजे बैलानी ओढलेल्या सारवटगाड्यांतून होत असे. रात्रीच्या वेळी आंबोली घाट चढत असताना, बैलगाडीत अगदी कडेला बसलेले, खांडेकरांचे वडील आत्मारामपंत कलंडले. सरळ रस्त्यात पडून त्यांच्या डोक्याला मार बसला. त्यातून अर्धांगवायूचं दुखणं अद्भवलं. या दुखण्याच्या पायी मुन्सफाची नोकरी त्याना झेपेना. मुन्सफ असण्याच्या काळात त्यांचं घर म्हणजे सुखवस्तू मध्यमवर्गियाचं घर होतं. घरी स्वयंपाकीण, मोलकरीण असलेल्या या आनंदी घरात, प्रतिष्ठित मंडळींची अठबस असे. खांडेकरांचे वडील रसिक होते. त्यामुळे नाटककार गोविंद बल्लाळ देवल, सांगली संस्थानचे मुख्य डॉक्टर आणि स्वतः खांडेकरानी ज्यांची 'मला भेटलेला पहिला देवमाणूस" अशी गौरवास्पद नोंद केली आहे, असे डॉ.हरी श्रीकृष्ण देव (धुळ्याचे समर्थभक्त शंकरराव देवांचे थोरले बंधू) अशी मंडळी येत असत. अशा 'देव देवलांच्या सहवासात काव्यशास्त्रविनोदात मजेत वेळ जाई. चार मित्र-मंडळी जमवून नाटकं बसवणाऱ्या, बाल खांडेकरानी खुद्द देवलांसमोरच, त्यांच्या 'शारदा' नाटकाचा एकपात्री प्रयोग केला होता !

 वडिलांच्या आजारपणापासून मात्र या सुखाच्या दिवसांना ओहोटी लागली. खांडेकरांच्या वडिलांचा मूळ स्वभाव तापट. ऑफिसात काहीतरी कुरबूर झाली. त्या भांडणात त्यांच्या अर्धांगाच्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढले. अपंग अवस्थेत त्याना अंथरुणाला खिळून पडावे लागले. आमदनी कमी झाली. भलं मोठं प्रशस्त घर सोडून थोड्याशा अंधाऱ्या आणि लहान जागेत राहावं लागलं. खांडेकरांचा मूळ स्वभाव हूड होता. चार सवंगडी जमवून नाटकं करावीत. कृष्णानदीकाठच्या मळीतून हुंदडावं. माळ्याची नजर चुकवून, मक्याची कोवळी लुसलुशीत कणसं खावीत. क्रिकेटचा खेळ तास न् तास खेळावा. अशा मौजमजेत चाललेल्या सुखाच्या बालपणाला दृष्ट लागली! अंथरुणाला खिळलेल्या, वडिलांच्या दुखण्याने, खांडेकराना आयुष्यातील दुःखाचे, वेदनेचे पहिले दर्शन झाले. आणि ते फार जवळून झाले. अितके जवळून की त्यामुळे खांडेकरांचा हूडपणा एकदम मावळला! वडिलांवर त्यांची आत्यंतिक श्रद्धा होती. त्यामुळे त्यांची सर्वतोपरी शुश्रुषा करण्याचं काम त्यानी आपल्या अंगावर घेतलं. त्यांच्या बिछान्याजवळ बसून, त्याना काहीतरी वाचून दाखवणं, त्याना दोन्ही वेळा भरवणं, शौचाला बसवणं वगैरे सर्व कामे ते निष्ठेने करु लागले. असं अकाली प्रौढत्व यायला परिस्थिती जशी कारणीभूत झाली, तशी काही अंशी त्यांच्या आईचा स्वभावहि कारणीभूत झाला. खांडेकरांची आई म्हणजे साने गुरूजींची 'शामची आई' नव्हती. प्रेमळ नव्हती पण तशी कजागहि नव्हती. खांडेकरानी स्वतःच म्हटल्याप्रमाणे तिच्या ठिकाणी संवेदनक्षमता अजिबात नव्हती. नवऱ्याला अर्धांगाचा आजार होईपर्यंत, या अर्धांगिनीने साधारणपणे सुखासीन जीवन व्यतीत केले होते. पण आर्थिक


सांगली आणि सांगलीकर................................................................................. १३३