पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते
वि.स. खांडेकर आणि सांगली



 'ज्ञानपीठ' पारितोषिक म्हणजे एक प्रकारचे नोबेल पारितोषिकच. भारतीय पातळीवरील साहित्य क्षेत्रातील केवढा मोठा पुरस्कार ! कुठल्याही प्रांतातील लेखकाला मिळाला, तरी त्या त्या प्रांतातील, साहित्यप्रेमींची छाती दोन इंच तरी अभिमानाने फुगत असेल! त्यातून महाराष्ट्रात तर काय, एक सोडून दोन दोन लेखकांना हा पुरस्कार मिळाला. आणि साहित्यातील या सर्वोच्च मानदंडाचा एक मानकरी चक्क सांगलीकर असावा? होय, सांगलीत जन्मलेल्या त्या सुपुत्राचे नाव विष्णू सखाराम खांडेकर. सांगलीकरांसाठी हा केवढा मानाचा शिरपेंच आहे! आद्य नाटककार विष्णुदास भावे, साधुदास, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या सांगलीकर नरशार्दुलांनी साहित्यशारदेच्या दरबारात पंचहजारी, सप्तहजारी काबीज करता करता राजसिंहासनच पादाक्रांत करावं, असाच हा खांडेकरांचा पराक्रम आहे हे नि:संशय.
 अशा या विष्णू सखाराम खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगलीत झाला. त्या दिवशी अंगारकी संकष्टी होती. गणपती सांगलीकरांचे दैवत. खांडेकरांचं घर सांगलीच्या सुप्रसिद्ध गणपतीमंदिराजवळच. साहजिकच त्यांचं नाव 'गणेश' ठेवण्यात आलं. लहानपणी खांडेकरानी लेखक व्हायची स्वप्नं रंगवली, तेव्हा लेखावरती 'गणेश आत्माराम खांडेकर' हे नाव झळकलेलं पाहायची त्यांची अतीव अिच्छा होती. पण योगायोग पहा कसा असतो. 'लेखक' म्हणून मानमान्यता मिळाली ती ‘विष्णु सखाराम खांडेकर' या नावाला! एकूण 'गणेश आत्माराम खांडेकरांचा' लेखक होण्याचा योग नव्हता; दत्तक जाण्याचा होता !

 खांडेकर मंडळी मूळची कोकणातील. सावंतवाडीकडची. खांडेकरांच्या वडिलांचे, घरात चुलत्यांशी पटलं नाही म्हणून त्यानी रागारागाने घर सोडलं आणि सांगलीत येऊन स्थिरावले. वकिलीचा अभ्यास करुन सनद मिळविली. काही काळ वकिली केली. मग ते सांगली संस्थानच्या राजवटीत मुन्सफ झाले. ते मुन्सफ असतानाच खांडेकरांचा जन्म झाला. त्या आधीचा खांडेकराना एक थोरला भाऊ होता. खांडेकर नंबर दोनचे. नंतर त्याना आणखी एक भाऊ झाला. खांडेकर दोन वर्षाचे असताना त्यांचे वडील सर्व कुटुंबियाना घेऊन, एकदा कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावं, या हेतूने


सांगली आणि सांगलीकर.......................................................................... १३२