पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असं मल्लविद्येचे शिक्षण देण्यास त्यानी सुरुवात केली. सांगलीच्या कुस्ती षौकिनांनी हरि नानांवरील प्रेमाखातर त्याना नदीकाठी केशवन व मंदिराच्या परिसरात एक तालीम बांधून दिली. कुस्तीसाठी तांबड्या मातीचा आखाडा, मल्लखांब, करेले अशा विविध सोयीनी ती तालीम सुसज्ज झाली. करड्या शिस्तीने हरि नाना तिथं तालीम करुन घेत. हरि नाना मल्लविद्येचे व्रतस्थ अपासक होते. त्यामुळे चारित्र्यपालनावर त्यांचा कटाक्ष असे. याबाबतीत कोणी थोडा जरी हलगर्जीपणा केला, तरी ते कोणाची गय करीत नसत. तत्क्षणी श्रीमुखात ठेवून देत किंवा तालमीतून कायमची हकालपट्टी करत. त्यामुळे आपल्या या गुरुविषयी शिष्यांच्या मनात आदरयुक्त भीती असे. जरब असे. त्यामुळेच ज्योतिरामदादा सावर्डेकर यासारखे 'भारत भीम' म्हणून नावलौकिक मिळवलेले पैलवान त्यांच्या शिष्यगणात होते. महाराष्ट्रातील राजकीय जीवनात विशेष स्थान असलेले, आमदार संभाजी पवार हे तर त्यांचे पुत्र. ते स्वतः आणि आता त्यांचा पुत्र, म्हणजे हरि नानांचा नातू, पृथ्वीराज पवार ह्यानी घरातील कुस्तीपरंपरा चौथ्या पिढीपर्यंत अबाधित राखलेली आहे.
 मल्लविद्येचे निस्सीम अपासक म्हणून हरि नानांच्याभोवती, जे एक वलय आहे, त्याभोवती आणखी एक तेजोवलय आहे. ते म्हणजे अध्यात्माचे. पैलवानी पेशाचा गडी आणि अध्यात्म यांचं काही नातं असेल, अशी आपण कधी तरी कल्पना करु का? पण हरि नानांच्या बाबतीत ही विलक्षण अपवादात्मक वस्तुस्थिती होती. वानप्रस्थानाश्रमाची कर्तव्ये त्यानी उत्तम पार पाडली. शिवाजी, तानाजी आणि संभाजी या तिन्ही पुत्रांनी पित्याचा वारसा व्यवस्थित सांभाळला. आपापल्या व्यवसायात स्वतंत्रपणे ते सुस्थिर झाले. हरि नानानी प्रपंच नेटका पूर्ण करुन आधुनिक युगाला साजेलसा संन्यासाश्रम पार पाडला. श्रीमद् भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांचा हरि नानांचा गाढा अभ्यास होता. संपूर्ण गीता त्याना मुखोद्गत होती. अपनिषदामधील तत्त्वज्ञान, आचार्यांची भाष्ये, विद्यारण्य, विवेकानंद या सर्वाचा अभ्यास त्यानी कुस्तीच्या अभ्यासासारखाच तन्मयतेने केला. मॅट्रिकला त्यांचे संस्कृत होते. मुळात कुशाग्र बुद्धी आणि त्याला सखोल चिंतनाची, मननाची जोड यामुळे दुर्मिळ मनःशांतीचा लाभ त्याना झाला. हजारो जरीचे पटके आणि शेकडो सोन्यारुप्याची कडी मिळवूनहि त्यांच्या वृत्तीत, पैलवान मंडळीत सहसा आढळणाऱ्या गुर्मीचा लवलेशहि नव्हता तो या आध्यात्मिक वृत्तीमुळेच. त्यात त्याना अिश्वरशास्त्री दीक्षित, रामचंद्र तथा पुटुनाना ठाणेदार, केळकर अशा मित्रपरिवाराची चांगली जोड मिळाली.

 सांगली नगरपालिकेने हरि नानांच्या ९२ व्या वाढदिवशी म्हणजे २ फेब्रुवारी १९९६रोजी मानपत्र देऊन सांगलीच्या या सुपुत्राचा थाटामाटात सत्कार केला. त्या भव्य सन्मानाच्या आठवणीत, सर्व सांगलीकर मन असतानाच, १६ मार्च १९९६ रोजी या मल्लविद्येतील द्रोणाचार्यांचा अंत झाला.

●●●


सांगली आणि सांगलीकर ............................................................... .१३१