पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हादरलेच. पंचमंडळी निकाल अधिकृतपणे सांगण्यासाठी ध्वनिक्षेपकापाशी आली.
 तेवढ्यात महाराजांकडून 'निरोप' घेऊन हुजऱ्या धावत आला आणि पंचमंडळीना सांगू लागला, “निर्णय जाहीर करु नका. कुस्ती पुन्हा एकदा झाली पाहिजे"
 आपला पैलवान पडला हे साहजिकच महाराजांच्या जिव्हारी लागलं होतं. निरोप ऐकून प्रमुख पंच गोंधळला. पण एकूण महाराजांचा निरोप ही काय 'चीज' असते हे तो पुरतेपणी जाणून होता. अंगावरची माती झटकत असलेल्या हरि नानांपाशी येऊन तो म्हणाला "माफ करा हं पाव्हणं, पण कुस्ती पुन्हा एकदा झाली पाहिजे. झाल्या कुस्तीवर मला निर्णय जाहीर करता येत नाही. "
 "का?"
 "का??"
 पंचाने तोंडावर असने हास्य आणले. ओशाळवाणे होत तो म्हणाला, "कुस्ती आपणच मारली आहे. नाही म्हणायला काय आमचे डोळे फुटलेत ? पण---"--?
 "पण काय?"
 "पण आपलं महाराजांच्या अिच्छेसाठी फिरुन एकदा---हाॅ, हाॅ हाॅ- "झक मारते तुमच्या महाराजांची मर्जी. कुणाच्या मर्जी- मेहेरबानीसाठी मी कुस्ती करत नसतो. कुस्तीसाठी कुस्ती करतो. समजलात!” हरि नाना ताडकन् म्हणाले.
 आणि ज्या तडफदारपणे त्यानी कुस्ती मारली, तितक्याच तडफेने, सोन्याच्या कड्याची अभिलाषा न धरता, स्वाभिमानी हरि नाना बाहेर पडले.
 ही आठवण मनात 'घर' करुन असल्यामुळेच कदाचित् संस्थानिकांच्या पदरी न जाण्याचा निर्णय हरि नानानी घेतला असावा. वास्तविक त्या दरबारी पैलवानाला पुन्हा कुस्तीत हरवणं त्याना अजिबात अशक्य नव्हतं. पण तसं करण्यात महाराजांची मर्जी संभाळण्याचा लोचटपणा केल्यासारखं झालं असतं आणि हरि नानांच्या मानी स्वभावात ते बसणारं नव्हतंच नव्हतं!
 हे एक आणि एकदा का संस्थानच्या मेहेरबानीच्या मोहात पडलं की मनात संपत्तीविषयी अभिलाषा निर्माण होईल. दिवसेंदिवस ती वाढतच राहील या वास्तवाचे हरि नानाना सजग भान होते. नुसत्या कुस्त्या मारण्यात आणि फेटे मिरविण्यात त्याना स्वारस्य नव्हते तर मल्लविद्येचे त्याना प्रेम होते.

 त्यामुळे योग्य वय होताच त्यानी आखाड्यातील कुस्ती सोडून दिली. गुरूची भूमिका घेतली. आपल्या गुरूंनी जसं आपल्याला विद्यादान केलं तसं मुक्तहस्ते विद्यादान करण्याचे त्यानी ठरविले. होतकरू पैलवानांना हाताशी धरुन त्याना शास्त्रशुद्ध


सांगली आणि सांगलीकर........................................................... १३०