पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लढतीमध्ये, महाकाय हत्तीच्या तुलनेत किरकोळ भासणारा सिंह हत्तीला नामोहरम करतो तशी हरि नानांची चपळाई होती. त्यांच्या बुद्धिचातुर्याने हरि नाना, कोणत्या वेळी कोणता 'डाव' करतील याचा भल्याभल्याना अंदाजच येत नसे. असं सांगतात की ज्याच्याबरोबर कुस्ती ठरलेली असेल, त्या पैलवानाला चार दिवस आधीपासूनच हरि नानांची धास्ती लागलेली असे! कुस्ती लागल्यापासून पहिल्या ५-१० मिनिटात काही करता आले तर ठीक, अन्यथा हरि नाना आपल्याला चीतपट केल्याशिवाय राहात नाहीत अशी त्याला भीती असे. पुढेपुढे पंधराशे जोर आणि दोन हजार बैठका मारल्याच पाहिजेत अशी त्यांची रोजची शिस्त होती. बरं, कुस्ती 'मारली' असं ते स्वतः म्हणतच नसत. कुस्ती 'झाली' एवढचं ते म्हणायचे.
 अनेक कुस्त्या मारल्यावर, हरि नानांच्या कीर्तीचा डंका गावोगावी वाजू लागला, तशी दक्षिण महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या संस्थानिकांकडून, “दरबार- मल्ल म्हणून आमच्याकडे या” अशी त्याना आमंत्रणे येऊ लागली. दरबार- मल्ल ही मोठी मानाची जागा होती. खुराकाची रेलचेल आणि मेहनतीसाठी ठेवायच्या जोडीदाराचा खर्च, परस्पर सरकारी खजिन्यातून ! वर अनेक संस्थानी सुखसोयी. पण वरवर सुखाचे वाटणारे हे वैभव आतून लाचारीने, आणि मिंधेपणाने लिडबिडलेले असते, हे हरि नाना जाणून होते. शेकडो एकर जमीन अनेक संस्थानिकांनी त्यांना आपल्या पदरी येण्यासाठी देऊ केली होती. पण हरि नानानी तो मोह टाळला. स्वाभिमानी हरि नानाना राजाश्रयापेक्षा, सर्वसामान्यांचा लोकाश्रय मोलाचा वाटला. शिवाय संस्थानिकांच्या लहरी आणि अनियंत्रित मर्जीपुढे, सर्वानाच "जी हुजूर" म्हणून कसे मुजरे करावे लागतात याची हरि नानाना स्वतःच्याच एका अनुभवावरुन कल्पना आली होती. तो अनुभव मोठा 'बोलका' होता. तो असा.

 एकदा एका संस्थानिकाच्या राजवाड्यातील चौकात कुस्त्यांचा फड लागला होता. हरि नानांची कुस्ती दरबारच्या पहिलवानाबरोबर ठरली होती. त्यामुळे श्रीमंतांच्या आणि अितर खाशा स्वाऱ्या सुशोभित शामियान्यात बसल्या होत्या. दूर दूर अंतरावरुन कुस्ती शौकीन मंडळी, मुद्दाम कुस्ती पाहण्यासाठी आली होती. सर्वांची अत्सुकता एकच. दरबारचा पैलवान म्हणजे राजेसाहेबांचा पठ्ठा जिंकणार की हरणार? पंचांनी हात वर करुन अिषारा केला. एकदम गोंगाट थांबला. हरि नाना फडात अतरले.. डाव्या भुजावर अजव्या हाताचा पंजा थोपटून, सलामीचा पहिला शब्द त्यानी असा काही घुमवला की त्यासरशी जाणते लोक हादरले. पोलादावर पोलाद आदळल्यासारखा त्याचा तो खणखणीत शड्डू ऐकून, श्रीमंताचा पठ्ठाहि मनात जरा चरकलाच. मातीच्या मुठी एकमेकाना मिळाल्या. दोन्ही मल्ल आवेशाने परस्पराना भिडले. आणि काय? दोन मिनिटातच कुस्ती खतम् . दरबारचा पैलवान चारी मुंड्या चीत झालेला पाहून सर्वजण


सांगली आणि सांगलीकर...................................................................................... .१२९