पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याची निष्ठा अजमावल्याखेरीज, आणि साऱ्या कसोट्यांना पुरेपूर अतरल्याखेरीज, गुरुमहाराज प्रसन्न होत नसत. शिवरामपंतानी आपल्या विद्यार्थ्याची कडवी परीक्षा घेतली. पण हजार हजार जोर आणि दीड दीड हजार बैठका मारुनहि हुं की चूं न करता, घामाने शरीर निथळत असतानासुध्दा, हरि नाना जिद्दीने पुन्हा करेला फिरवायला अभे राहू लागले, तेव्हा शिवरामपंताना जाणवलं की हे बावनकशी सोनं आहे!
 मग काय? आपल्याजवळ जे जे आहे ते सारं, भरभरुन द्यायला त्यानी सुरुवात केली. पण नुसत्या मेहनतीने काय होणार? बलसंवर्धनेसाठी साजेशा खुराकाची जोड हवीच. हरि नानांच्या घरच्या परिस्थितीची यथार्थ जाणीव शिवरामपंताना झाली, तेव्हा त्यांनी आपल्या खर्चाने, रोज डबाभर तुपाळ शिरा, चरवीभर धारोष्ण दूध असा घसघशीत खुराक हरि नानाना सुरु केला.
 धन्य ते गुरु, धन्य ते शिष्य !
 शिवरामपंतानी कुस्तीमधील सगळे बारकावे आणि खास डावपेच शिकवले. पण सुदैवाने हरि नानाना, आणखी एका मातब्बर गुरुच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यांचं नाव चाँदसाहेब शिकलगार त्यांची शिकवण्यातील आपुलकी पाहून हरि नाना भारावून म्हणाले होते की " या विद्येचे (मल्लविद्येचे) मर्मच त्यानी मला अकलून दिले. वयातील आणि ज्ञानातील अंतर विसरून त्यानी मला स्वतः जातीने अंगावर घेऊन खेळविले आणि त्यात संपूर्णपणे तन्मय होऊन, मल्लविद्येचा साक्षात्कार घडविला........-त्यांचे अपकार जन्मोजन्मी फिटणार नाहीत. "
 गुरूजनांच्या मशागतीला फळ येऊ लागले.

 कसून मेहनत करायची आणि कुठलाहि फड चुकवायचा नाही असा हरि नानानी निश्चयच केला. गावोगावचे फड ते गाजवू लागले. त्यावेळच्या मोठमोठ्या मल्लांना त्यानी चितपट केले. मल्लाप्पा कल्हईवाला, मल्लाप्पा तडाखे, बाळू पानारी, गुलाम कादर, कर्नाटकसिंह शिवरुद्र, बाळाप्पा चौकवाला, सिद्दाप्पा बेडकीहाळ अशा अनेक मल्लांवर त्यानी मात केली आणि जवळजवळ दीड तपाहून अधिक काळपर्यंत, सांगलीची कीर्तिध्वजा त्यानी त्यावेळच्या मुंबई इलाख्यात फडकत ठेवली होती. वज्रदेही आणि पोलादी दंडाचा मल्ल म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या सडपातळ देहावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज सहसा येत नसे. प्रतिस्पर्ध्याने खडाखडीच्या वेळी हात हातात धरला, की त्याला कळून चुके की हे 'पाणी' काही न्यारंच आहे. बुद्धिचातुर्य आणि डावपेंचातील कौशल्य यावरच ते कुस्ती करत आणि प्रतिस्पर्ध्याला आपली पाठ जमिनीला कधी लागली तेच मुळी कळत नसे! हत्तीचा आकार भला दांडगा असेल, त्याची ताकद दहा सिंहांना भिरकावून देण्याची असेल पण प्रत्यक्ष


सांगली आणि सांगलीकर........................................................... . १२८