पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुस्ती, मल्लखांब, क्रीडांगणावरील हुतुतु, सुरपाट्या इत्यादि खेळांकडे त्यांचे लक्ष अधिक होतं. त्यांच्या सुदैवाने सिटी हायस्कूलचे त्यावेळचे तालीममास्तर, रास्ते गुरुजींचे, छोट्या हरिकडे लक्ष गेले. हरिच्या खेळाचे आणि चपलतेचे त्याना कौतुक वाटले. हुतुतु, सुरपाट खेळताना, हरिने सहज मारलेला रपाटा, दुसऱ्या खेळाडूला पाठ चोळायला लावी ! रास्ते गुरुजीना हरिचं कुस्तीप्रेम प्रकर्षाने जाणवलं. म्हणून त्या गुणग्राहक गुरुजीनी, हरिला कुस्तीचे शास्त्रशुध्द धडे द्यायला सुरुवात केली. हरिची घरची परिस्थिती प्रतिकूल आहे, हे माहीत असल्याने, या कुस्तिवीराला चांगल्या पौष्टिक खुराकाची आवश्यकता आहे, याची जाणीव ठेवून, तशा खुराकाची जोडणी त्यानी स्वतः केली. थोड्याच काळानंतर, आपला हा शिष्य कुस्तीत चांगला तरबेज झाला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. पण पैलवानाचा खरा कस आखाड्यातच लागणार? तेव्हा रास्ते गुरुजीनी हरिला कुस्तीच्या फडात अतरवण्याचे ठरविले. सुदैवाने त्याच सुमारास साताऱ्यास कुस्त्यांचा फड लागला होता. त्या फडासाठी रास्ते गुरुजीनी हरिला स्वत:च्या खर्चाने पाठवले. सातारच्या फडात, हरिने हजारो प्रेक्षकांना आश्चर्यचकित करुन सोडलं. त्यांच्या डोळ्यादेखत आपल्याहून भारी पैलवानाला हुकुमी डाव करुन अस्मान दाखवलं. रास्ते गुरुजींना याहून मोठी गुरुदक्षिणा ती कोणती? जाणकारांना त्याच वेळी हरि नानांच्या कुस्तीतील कौशल्याबरोबरच, त्यांच्या बुध्दिचार्तुयाचीही जाणीव झाली. या यशाने हरि नानांचे सर्वत्र कौतुक झाले.
 आणि त्याचवेळी कुस्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ही गोष्ट हरि नानानी मनात निश्चित केली.
 आजवर एक बऱ्यापैकी ताकदीचा, होतकरू पैलवान म्हणून हरि नानांकडे बघितले जाई. पण सातारच्या यशाने कुस्तीगीर म्हणून नाव कमवायची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. वाटेल तितकी मेहनत, कष्ट करायची त्यांची तयारी होती. वडिलांना कुस्तीची आवड होती पण पैशाची सवड नव्हती. तीच परिस्थिती हरि नानांची होती. घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली. त्यात भर म्हणून त्यांचे लग्न त्याकाळच्या रीतीप्रमाणे अवघ्या तेराव्या वर्षीच लावून देण्यात आले होते. पैलवान व्हायचं म्हणजे हत्ती पोसायचे काम ? तेव्हा हे जमावं कसे ? हरि नानांची तीव्र अिच्छाशक्ती एवढीच जमेची बाजू !
 अिच्छा असली की मार्ग सापडतो.

 हरि नानाना मार्ग सापडला. त्यावेळी सांगलीत शिवरामपंत पटवर्धन नावाचे नामांकित अस्तादजी होते. त्यांच्याकडे मल्लविद्या शिकण्याची अिच्छा हरि नानानी व्यक्त केली. जुन्या काळचे गुरु आजच्यासारखे सहजप्राप्य नव्हते. विद्यार्थ्याचा कस आणि विद्येवरची


सांगली आणि सांगलीकर................................................................. .१२७