पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होतं.
 वर अल्लेखलेला किस्सा, हरि नाना मुंबईला गेले होते, तेव्हा घडलेला होता. आपल्या केळकर या जिवलग मित्राबरोबर ते मुंबईला गेले होते. पृथ्वीराजकपूरजीनी शेवटपर्यंत हरि नानांशी ओळख ठेवली होती. सांगलीत 'दीवार' 'पठाण' वगैरे पृथ्वी थिअटर्सची नाटके करण्यासाठी, पृथ्वीराज आले होते, तेव्हा आवर्जून त्यानी हरि नानांची भेट घेतली होती.
 पैलवान गडी म्हटलं की दोन्ही अस्तन्या वर करुन, जाता येता दिसेल त्याच्यावर गुरगुरणारा, मस्तवाल दांडगट माणूस, असं चित्र अनेकदा, नाटक- सिनेमातून आपल्यापुढे अभं केलं जातं. या समजुतीला पूर्ण छेद देणारं असं हरि नानांचं व्यक्तिमत्व होतं. सालस वृत्ती, नम्रपणा हे त्यांचे अंगभूत गुण. पुढे पुढे अध्यात्माच्या अभ्यासाने, त्यांचं व्यक्तिमत्व अधिकच शांत, आणि चिंतनशील झालं. कुस्तिगीर आणि अध्यात्मात रमणारा, असं ऐकायलासुध्दा अविश्वसनीय वाटतं ! म्हणून तर हरि नानांचं सांगलीला कौतुक वाटतं.
 अशा या हरि नानांचा जन्म ५ मे १९०५ रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे झाला. सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या हरि नानांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या वडिलानी आपल्या या मुलाला मोठी 'अिस्टेट' दिली. ती म्हणजे मजबूत शरीरयष्टी आणि कुस्तीची आवड ! छोट्या हरिच्या वडिलांना कुस्तीचा जबरदस्त नाद होता. त्या वेडापायी कडेपूरची छोटीशी जमीन होती ती पण संकटात सापडली. कुटुंबाची ओढाताण झाली. पण कुस्तीची अनिवार ओढ काही सुटत नव्हती.
 छोट्या हरिला कुस्तीवरील प्रेमाचं असं बाळकडूच मिळालं होतं !
 त्यांचं बालपण कृष्णेच्या काठी गेलं. सवंगडी जमवून हुतूतू खेळावं. कृष्णेच्या पात्रात मनसोक्त डुंबावं. दमछाक झाली की मक्याची कोवळी कणसं खावीत. असा कृष्णेच्या पाण्यावर त्यांचा पिंड पोसला गेला. नाट्याचार्य देवल म्हणत की कृष्णेच्या पाण्यात वीज आहे. त्यामुळे असेल कदाचित् की ती विजेची चपळाई त्यांच्या अंगात अवतरली आणि भविष्यकाळात त्याच चपळाईनं हरि नानानी अनेकाना चकित करुन सोडलं !

 हरि नानांचं प्राथमिक शिक्षण तसं अशीराच सुरु झालं. वयाच्या ९ व्या वर्षी ते शाळेत जाऊ लागले. प्राथमिक शिक्षणानंतर वयाच्या १४ व्या वर्षी ते सांगली गावभागातील सिटी हायस्कूलमध्ये, म्हणजे इंग्रजी शाळेत जाऊ लागले. (त्या काळी ५ वी पासूनच इंग्रजी शिक्षणास सुरुवात होई, म्हणून माध्यमिक शाळांना इंग्रजी शाळा म्हणत) त्यांची बुद्धी तल्लख असली तरी मुख्य विषयांपेक्षा शाळेच्या तालमीतील


सांगली आणि सांगलीकर.................................................................... १२६