पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तात्यासाहेबांच्या मळ्यातील हिरव्यागार पाण्याच्या प्रशस्त विहिरीत मारलेल्या अुड्या, माळबंगल्याच्या अजाड माळावरच्या वडाच्या झाडांवरील सूरपारंब्या, सांगली नगरवाचनालयात धुंडाळलेल्या हरिभाऊ, नाथमाधवांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, अशा बालपणीच्या अनेक आठवणी व्याकूळ करुन टाकत असत.

 पण हे होतं गावाचं प्रेम. निखळ प्रेम.

 जसजसं वय वाढत गेलं, जाणिवा रुंदावत गेल्या, तसतसं आपलं गाव कसं अभिमान बाळगण्याजोगं आहे याची सुखद जाणीव होऊ लागली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चंदू बोर्डेचा बॅकफूट कव्हर ड्राईव्ह बघताना, विजय हजारेंच्या लाजवाब कव्हर ड्राईव्हची आठवण निघायची. मग कुणी विचारायचा ” अरे, हा हजारे तुमच्या सांगलीचा ना? " सी. सी. आय. माटुंगा जिमखाना येथे बॅडमिंटन मॅचेस बघताना नंदू नाटेकरांच्या आठवणी निघायच्या आणि मग हा जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू आपल्या सांगलीचा आहे याचा अभिमान वाटायचा.

 साहित्यसंमेलनातून, नाट्यसंमेलनातून वावरताना, आज फोफावलेल्या नाट्यसृष्टीचे जनक (विष्णुदास भावे) सांगलीचे आहेत. गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दोन नाट्याचार्य सांगलीकरांनीच आपल्या अजरामर नाटकांमुळे सांगलीची कीर्तिध्वजा फडकत ठेवली, या वस्तुस्थितीचा अभिमान वाटायचा. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या शिल्पकारांमध्ये अग्रस्थानी असणारे, मराठीतील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, वि.स. खांडेकर हे सांगलीचे आहेत या जाणीवेने अूर भरुन यायचा. संगीताच्या मैफलीतून वावरताना आबासाहेब सांबारे, या सांगलीच्या धन्वंतरीच्या आठवणी निघायच्या, तेव्हा आश्चर्याने थक्क व्हायला व्हायचं. गानमहर्षी अल्लादियाखाँसाहेबांचा आवाज कसा त्याना 'सोडून' गेला होता आणि सांबारे वैद्यानी कसा या संगीत-सम्राटाला ‘पुनर्जन्म' मिळवून दिला, मोगुबाई कुर्डीकरांसारख्या गान-तपस्विनी, नाथमाधवांसारखे कादंबरीकार, सांगलीत या वैद्यबुवाचं औषध मिळावं, देखरेख लाभावी, म्हणून कसे सांगलीत येऊन रहात असत, यांच्या आठवणी निघत. खुद्द लोकमान्य टिळक, आबासाहेबांना किती मानत असत याच्या साक्षी निघत. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय कर्तृत्वामुळं सांगलीचं नाव, महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण देशात दुमदुमत होतंच!

दहा