पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयत्या वेळी त्यांच्या गुरुची (म्हणजे हणमंतराव कोटणीस) कृपा झाली म्हणून ते जिंकले. अर्थात् अशी त्या साधुदासांची श्रद्धा होती. स्पर्धा संपल्यावर तेच म्हैसकराना म्हणाले, दोघांच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती की गोपाळराव (साधुदास) संभ्रमित अवस्थेत होते. त्या 'नेमक्या' क्षणी तात्यांनी (कोटणीसानी) कानात सांगितले, "गोपाळ, मात होत आहे. नीट पहा." आणि मी सावध झालो.
 हा अर्थातच श्रद्धेचा भाग होता. गंमत म्हणजे पुढे काही वर्षानंतर म्हैसकरानी याच कोटणीसमहाराजांच्या चिरंजिवांकडून म्हणजे रघुनाथराव तथा बाबुराव कोटणीस याजकडून अनुग्रह घेतला!
 यानंतर म्हैसकरानी प्रांत पातळीवरील बुद्धिबळस्पर्धेत खेळायला सुरुवात केली. १९४८ मध्ये चेस क्लब ऑफ इंडिया यानी मुंबईत भरवलेल्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून चांदीची फिरती ढाल मिळवली. या स्पर्धेत आर. बी. सप्रे, वाड, रत्नाकर, डॉ. कुन्हा, बिलीमोरिआ अशा राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर आपला खेळ अजमावण्याची त्याना संधी मिळाली. चांगला अनुभव मिळाला. तत्कालीन मुंबई स्टेटचे गव्हर्नर राजा महाराजसिंग यांच्या हस्ते बक्षिससमारंभ झाला. म्हैसकरानी इंग्रजीत भाषण केले. मुंबईत खेळण्याची मजा काही औरच असते. लगोलगच म्हणजे १९५० मध्ये मुंबईच्या चेतना रेस्टॉरंटमध्ये झालेल्या मॅचेसमध्ये त्याना खेळायला मिळाले. या मॅचेसना मुंबईच्या वृत्तपत्रांतून, विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रांतून कशी प्रसिद्धी असते त्याची पण चव त्याना चाखायला मिळाली. एम्. के. गवांडे या खेळाडूसमोर खेळताना म्हैसकराना हार खावी लागली. अनेक सामने जिंकणाऱ्या म्हैसकरांच्या या पराभवाचे इंग्रजी वृत्तपत्राचे हेडिंग होते "गवांडे- म्हैसकर्स वाटर्लू"

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५५ साली आंध्र-प्रदेशातील एलूरु येथे पहिली ऑल इंडिया चेस टूनामेंट झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातर्फे खेळण्यासाठी आणखी अितर दोघांबरोबर म्हैसकरांची निवड झाली होती. राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव. मुंबईचे सप्रे, कानपूरचे रामदास गुप्ता, केरळचे सी. एल. सुब्रम्हण्यम्, ओरिसाचे प्रा.राजगुरु, मद्रासचे एस. के. नरसिंहम् अशा खेळाडूंबरोबर गाठ होती. या स्पर्धेत म्हैसकर तिसरे आले खरे, पण स्वतःवरच थोडे नाराज झाले. राष्ट्रीय स्तरावर खेळताना आपल्या मर्यादांची त्याना जाणीव झाली. अनेक डाव हकनाक हातातून निसटले याचे त्याना दुःख झाले. त्याना स्वतःला ओपनिंगची थोडी भीती वाटे. मात्र मिडलगेम त्याना चांगला अवगत होता. शक्यतो एंडगेमपर्यंत डाव जाऊ द्यायचाच नाही. मध्येच जिंकायच्या प्रयत्नात सतत रहायचे. डाव हातातून जातोय अशी स्थिती


सांगली आणि सांगलीकर.............................................................. .१२१