पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बुद्धिबळपटू भालचंद्र म्हैसकर



 सांगली नगरीला क्रिकेट, बॅडमिंटन अशा खेळांची खास परंपरा नव्हती. मात्र विजय हजारे आणि नंदू नाटेकर या सांगलीच्या सुपुत्रानी, वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर, मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये यश मिळवलं. पण बुद्धिबळाच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येत नाही. या खेळाची सांगलीत किमान दोनशे वर्षांची परंपरा आहे. अकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, सांगलीत मोरभटजी मेहेंदळे, विनायकराव खाडिलकर, बाबा बोडस, गोपाळराव मुजुमदार (म्हणजे सुप्रसिद्ध कवि साधुदास) नारायणराव जोशी, अण्णा गद्रे या मंडळीनी बुद्धिबळाची परंपरा निर्माण केली. आपल्या खेळातील कौशल्याने सांगलीचे नाव सर्वतोमुखी केले. हीच परंपरा नंतरच्या पिढीतील शंकरराव म्हैसकर, बाळशास्त्री फाटक, अप्पासाहेब (पु.ल.) खाडिलकर, नारायणराव खाडिलकर तम्माणाचार्य पडसलगीकर (नूतन बुद्धिबळ मंडळ,सांगली या संस्थेचे अध्यक्ष, भाऊसाहेब पडलगीकर यांचे वडील) आदी सांगलीकरानी अधिकच गौरवशाली बनवली. याच पिढीमधील एका सांगलीकराने, सांगलीचं नाव बुद्धिबळाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्या सांगलीकराचं नाव भालचंद्रपंत म्हैसकर.

 म्हैसकरांचा जन्म १९०८ सालचा. बुद्धिबळाचं तसं त्याना बाळकडूच मिळालेलं होतं. त्यांचे वडील परशरामपंत, सावत्र बंधू शंकरराव म्हैसकर हे नामांकित बुद्धिबळपटू होते. चुलते खेळत असत. अितकेच काय पण त्यांचे आजोबा रंगात आले की गोल लाकडी ढोकळ्यांची तांबडी-पिवळी बुद्धिबळे घेऊन खेळत बसत! याहून गमतीची गोष्ट म्हणजे खुद्द म्हैसकरांच्या लग्नात त्यांच्या वडिलाना बुद्धीबळात गुंग झालेले असताना, आग्रहाने बोलावून आणायला लागलं! म्हैसकरांची आई लहानपणीच गेलेली असल्याने लग्नाच्या वेळी देवक चुलत्याना बसवायचे होते. त्यामुळे वडील खेळायला मोकळे होते!. अितक बुद्धिबळाचं बाळकडू !

 म्हैसकरांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरात झाले. शालेय आणि महाविद्यालयीन


सांगली आणि सांगलीकर.... ११७