पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अद्धृत करण्याचे कारण अितकेच की त्यांचे वरील दोष समजले जाणारे स्वभावविशेष, वास्तवात सद्गुणच मानावे लागतील. न्यायखात्यात निःस्पृहपणे वागायचे तर समाजात फार सवंगपणे वागून चालत नाही. आज गरजेपेक्षा अधिक सैलपणाने वागणारे आणि समाजात स्वत:ला 'सवंग' करुन घेणारे अच्चपदस्थ अधिकारी बघितले आणि त्यामुळे भ्रष्ट होत असलेले समाजजीवन बघितले, तर काव्यविहारींसारख्यांचा मोठेपणा स्पष्ट होईल.
 प्रा. श्री. के. क्षीं नी तर काव्यविहारींच्या वाङमयीन आत्मचरित्रात्मक पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना, मार्मिकपणे म्हटलय की "त्यांच्या व्यक्तिमत्वात रोमँटिक कवी आणि संस्थानी मामलेदार यांचे विचित्र मिश्रण आहे. टेबलावरील फायली झपाझप अरकून टाकणे, हा ज्यांचा दैनंदिन कार्यक्रम, अशा 'हपीसरांसारखी' त्यांच्या मनाची अंशत: घडण आहे तर अंशत: रविकिरण मंडळाच्या पूर्वीच्या रसिक, आदरशील, आशावादी आणि प्रगतिशील कवीसारखी आहे.' त्यांचे जामात, प्रिं. क. श्री. काळे यानी काव्यविहारीविषयक अनेक प्रकाशित लेखांचे, निवडक प्रातिनिधिक कवितांचे साक्षेपी संपादन करुन, एक अत्तम संग्रह तयार केला आहे. पुस्तकरूपाने जरी ते प्रसिद्ध केले नसले तरी त्या संग्रहाच्या प्रती त्यानी पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र साहित्यपरिषद्, सांगली नगरवाचनालय, अशा महत्वाच्या संस्थांकडे दिल्या आहेत. काव्यविहारींच्याविषयी लेखन करु अिच्छिणाऱ्या अभ्यासकांना हे काम उपयुक्त ठरेल.
 सांगलीतील साहित्यप्रेमी रसिक काव्यविहारींचे अत्यंत सहृदयतेने स्मरण ठेवतील यात शंका नाही.

●●●

सांगली आणि सांगलीकर................................................................ ११६