पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुन्हा चालना मिळाली. 'स्फूर्तिनिनाद' (१९५०) आणि 'स्फूर्तिविलास (१९५४) हे आणखी दोन काव्यसंग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. त्यांच्या एका नाट्यविषयक व्याख्यानाने प्रा. श्री. के क्षीरसागरांसारखा, रसिक समीक्षक, एवढा प्रभावित झाला की काव्यविहारीनी आपली नाट्यविषयक मौलिक माहिती रसिकांपर्यंत पोचवावी म्हणून गद्यलेखनाचा आग्रह त्यानी काव्यविहारींकडे धरला. त्यातूनच "नाट्यसुगंध' (१९६०) व ‘नाटककार देवल-व्यक्ति आणि वाङमय' (१९६३) अशी त्यांची दोन पुस्तके सिद्ध झाली. श्री.के.क्षींच्याच आग्रहावरून त्यानी 'माझे वाङ्मयीन जीवन' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले.
 काव्यविहारीना आपले आत्मचरित्र काव्यात गुंफायची फार अिच्छा होती. ६ सप्टेंबर १९६१ ते २७ सप्टेंबर १९६१, या २१ दिवसात "जीवनदर्शन-आत्मचरित्रपर खंडकाव्य,” दररोज सलग चार तास 'सविकल्प समाधी'त बैठक ठोकून, मोठ्या तन्मयतेने त्यानी लिहून पूर्ण केले. अर्थात् त्यामध्ये १९६१-६२ पर्यंतचाच काळ आला आहे. या खंडकाव्याची चरणसंख्या ४६१८ आहे. दुर्दैवाने हे खंडकाव्य अद्यापपावेतो अप्रकाशित राहिले आहे. प्रसिद्ध झाले असते, तर पद्यात्मक आत्मचरित्र म्हणून, मराठी साहित्यात गौरवाचे स्थान त्याला निश्चित प्राप्त झाले असते. कारण मराठीत गद्य आत्मचरित्रांचे अदंड पीक आलेले असले, तरी पद्यात्मक आत्मचरित्र, हा अत्यंत दुर्लभ प्रकार आहे. हे आत्मचरित्र एका अर्थी अपुरे असले, तरी बऱ्याच अर्थी पूर्ण झालेले आहे. याचे कारण असे की काव्यशास्त्रविनोदात रममाण होऊन सुखाने वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करत असेपर्यंतचा सगळा भाग या चरित्रात आला आहे.पुढे एका सायकलची धडक बसून त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. त्यातच त्याना अर्धांगाचा झटका आला. नंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली पण लेखन मात्र बरंचसं थंडावलं. १९७१-७२ मध्ये घरीच कॉटवरून पडून त्यांच्या मांडीचे हाड मोडले आणि ते पूर्णपणाने आंथरुणाला खिळले. अखेर २२ जानेवारी १९७५ रोजी ते शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाले! शेवटच्या विकलांग अवस्थेतसुध्दा त्यांनी मनाची शांति व चेहेऱ्यावरची प्रसन्नता आश्चर्यकारकपणे जपली होती.

 असं म्हणण्याचं कारण अितकचं की तसे ते मनमोकळ्या स्वभावाचे व मित्रांच्या मोठ्या कळपात वावरणारे नव्हते. न्यायखात्याच्या नोकरीमुळे असेल कदाचित्, पण तर्ककर्कश आणि कतर्व्यकठोर होते. त्यांची कवयित्री कन्या, सौ. विमल काळे यानी एके ठिकाणी म्हटलय " तसे आप्पा (काव्यविहारी) थोडे रागीट, एककल्ली, स्पष्टवक्ते आणि तऱ्हेवाईक म्हणून प्रसिध्द होते.......त्याना बुधगावात एकही जिव्हाळ्याचा मित्र नव्हता......त्यांची कामातली शिस्त, वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा आणि निःस्पृहता यामुळे राजेसाहेबांसकट, सर्वजण त्याना वचकून असत." हे मुद्दाम


सांगली आणि सांगलीकर......................................................... . ११५