पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखनामागील भूमिका

 १९६१ मध्ये मी सांगली सोडली आणि १९९६ मध्ये मी पुन्हा कायम वास्तव्यासाठी सांगलीत आलो. दरम्यानच्या काळात मी मुंबईला रिझर्व्ह बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या, बँकांची बँक असणाऱ्या संस्थेत नोकरी केली. रिझर्व्ह बँक आणि तिथं लाभलेला अफाट स्नेहपरिवार यांचे माझ्यावर अनंत अपकार आहेत. ऑफिसातील अनेक गुणीजनांमुळेच मला बॅडमिंटन, क्रिकेट, ब्रिज, कॅरम, ट्रेकिंग आदि क्रीडाविषयांपासून साहित्य, संगीत, नाट्य, अशा विविध विषयांकडे डोळसपणे पाहून त्यातील सौंदर्य समजावून घेण्याची, आनंद लुटण्याची दृष्टी लाभली. सांगलीतील विविध क्षेत्रांमधील, मानदंडांच्या कर्तृत्वाकडे पाहताना, मला या दृष्टीचा अुपयोग झाला.

 या ३५ वर्षांच्या दीर्घकालीन विरहातसुध्दा 'सांगली' या रम्या नगरीची आठवण एखाद्या प्रेयसीच्या आठवणीसारखी, माझ्या मनात सदैव ताजी होती! परगावात राहिलं की आपल्या जन्मगावाचं प्रेम आणि परदेशात राहिलं की आपल्या देशाचं प्रेम वाढीस लागतं! हा अनुभव सर्वांचाच असेल पण मोगल बादशहा बाबराने आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय तशी माझी गत व्हायची. दिल्लीत येऊन त्याने मोगल पातशाही स्थापली, वैभवात लोळू लागला तरी त्याला त्याच्या काबूल, कंदाहारच्या आठवणी, लालचुटुक रसरशीत कलिंगडाच्या फोडींच्या आठवणी, अस्वस्थ करुन टाकत. मुंबईच्या अलिशान बिल्डिंगज्, अंची हॉटेल्स, विश्वविख्यात ब्रेबॉर्न स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, तिथल्या क्रिकेट-मॅचेसच्या चित्तथरारक लढती, जहाँगीर आर्ट गॅलरीमधली प्रदर्शने, शिवाजी मंदिर, गडकरी रंगायतनची नाटकं, अखिल भारतीय कीर्तीच्या गायकांच्या, षण्मुखानंद हॉल, एन.सी.पी.ए., रंगमंदिर या ठिकाणी होणाऱ्या मैफली, अशा 'वैभवात ' असतानासुद्धा मला आठवायची ती श्रावणी सोमवारची हरिपूरची जत्रा, आयर्विन ब्रिजच्या गॅलरीमधून दिसणारा कृष्णेचा महापूर, सांगली हाय्ग्स्कूल ग्राउंडवरील (आताचं छत्रपती शिवाजी स्टेडियम ) संभू चाबूकस्वार, विवेक हजारे, विजय भोसले यांनी गाजवलेल्या आरवाडे शील्डच्या, चिंचेच्या झाडांवरुन (तो आमचा 'अस्ट स्टँड'!) पाहिलेल्या क्रिकेट मॅचेस,

नऊ