पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खरोखरीच त्यांच्यावर पडला असावा, असं दर्शवणारी आहे.
 “वेडी मुले” या कवितेत भारतमातेला अद्देशून काव्यविहारी म्हणतात.

"परदास्याची बेडी होती पायी तव जेधवां
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवां
काही वेडी मुले तयांची भडकुनि गेली मने
क्रांतीपूजा केली त्यानी रुधिराच्या तर्पणे "

 काव्यविहारी आचार-विचाराने आधुनिक होते. समाजविघातक रुढी, परंपरा आणि अंधश्रध्दा यांच्याविरूद्ध त्यानी पहिल्यापासून बंडच पुकारले. परमेश्वराविषयी श्रध्दा असली, तरी वाचनाने, अच्च शिक्षणाने, त्यांचे मन दिसेल त्या शेंदूर फासलेल्या दगडाला, देव मानण्यास राजी झाले नाही. पण विश्वाचे नियंत्रण करणारी काही एक शक्ती निश्चित आहे आणि तिलाच परमेश्वर मानावे, अशी त्यांची धारणा खालील कवितेत व्यक्त होते.

"व्यापोनिया विश्व स्वयंप्रकाशी
प्रकाशवी जो शशि- भास्करांसी
आणि निरोधी ग्रहमंडलासी
चैतन्य जगी स्फुरवी तो देव माझा "

 बुधगावात जरी काव्यविहारी मिठाची गुळणी धरुन बसत तरी बाहेरगावी गेल्यावर, आपल्या काव्यगायनाच्या कार्यक्रमाने श्रोत्यांना जिंकून घेत. अलीकडे लोकप्रिय झालेली काव्यगायन-वाचनाची प्रथा एका परीने त्यानी सुरु केली असं म्हणायला हरकत नाही. काही कविता ते गात असत पण त्यांचा भर काव्यवाचनावर असे. ओजस्वी कविता, खडा आवाज, स्पष्ट पण लयबद्ध शब्दोच्चार, यामुळे त्यांचे काव्यवाचन फार परिणामकारक होई.
 त्यांची एकूण सात पुस्तके, चार काव्यसंग्रह आणि तीन गद्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पहिला काव्यसंग्रह 'काव्यविहार' (१९२३) तर दुसरा आचार्य अत्रे यानी पुढाकार घेऊन प्रकाशित केलेला, आणि वि. स. खांडेकरानी प्रस्तावना लिहिलेला 'स्फूर्तिलहरी' १९३६ साली प्रसिध्द झाला. "दक्षिणा प्राईज कमिटी' ने या काव्यसंग्रहास पारितोषिक देऊन आणि मुंबई विद्यापीठाने एम. ए. परीक्षेसाठी नेमून त्याचा गौरव केला. त्यामुळे काव्यविहारीना तत्कालीन मराठी कवींमध्ये मानाचे स्थान मिळाले.

 १९४८ साली संस्थान विलीन झाल्यावर, त्यानी मुदतीपूर्वीच सेवानिवृत्ती घेतली व ते सांगलीत स्थायिक झाले. साहित्य, नाट्य, काव्य, व संगीत इत्यादी सांस्कृतिक अपक्रमांचे माहेरघर असलेल्या, सांगलीत त्यांच्या साहित्यनिर्मितीला


सांगली आणि सांगलीकर............................................................. ११४