पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे नोकरीसुध्दा कठोर व्रतासारखी करणारी. अत्यंत कर्तव्यतत्पर आणि कर्तव्यकठोर. आपलं काव्य, आपल्या आवडीनिवडी, त्यानी संस्थानी नियमांच्या आड कधीच येऊ दिल्या नाहीत. ते म्हणायचे " मी प्रथम संस्थानचा नोकर, मग कवी. तो सुद्धा बुधगावच्या हद्दीबाहेर."
 पण सुदैवाने नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच त्याना अचानक एका 'ओअॅसिसचा' लाभ झाला. त्याचं असं झालं :-
 त्यांची नोकरी १९१९ साली सुरु झाली. त्याच सुमारास सांगलीतील विलिंग्डन कॉलेज सुरु झालं. १९२१ साली ऐच्छिक भाषा म्हणून मुंबई विद्यापीठाने मराठीला स्थान दिले. कॉलेजात मराठी शिकवायला कोणी योग्य माणूस मिळेना म्हणून विलिंग्डनचे प्रिन्सिपॉल भाटे स्वतः बुधगावला काव्यविहारींकडे गेले. म्हणाले की, “मी गद्य विभागाकडे बघतो. तुम्ही पद्यविभाग शिकवा." एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर बुधगावच्या राजेसाहेबाना भेटून त्यांची रीतसर परवानगी काढून आले. अशा रीतीने संस्थानी नोकरी सांभाळून १९२२ ते १९२५ या काळात, मराठीचे प्राध्यापक म्हणून काव्यविहारीनी अध्यापन केले. आपल्याला जमेल का नाही अशा संभ्रमात असलेले काव्यविहारी, नंतर मात्र या कामात रमून गेले. त्या निमित्ताने जुन्या-नव्या काव्याचा अभ्यास करायला मिळाला याचाच आनंद त्याना फार झाला.
 संस्थानी राजवटीच्या आणि पारतंत्र्याच्या काळामुळे त्यांची कविता काही प्रमाणात कठोर, रुपकात्मक व थोडी साम्यवादी बनली. 'स्फूर्तिलहरी' मधील ‘हरिणीप्रत,' ‘अंबरातले किडे,' पाळीव पोपटास', 'मैना' तर 'स्फूर्तिनिनाद' मधील बांडगुळे, दिवाभीते, काजवे या कविता तशा धाटणीच्या बनल्या आहेत. “अंबरातले किडे” ही त्यांची गाजलेली कविता, ब्रिटीशानी पारतंत्र्याच्या काळात ऐदी बनवलेल्या, संस्थानिकांस चांगलाच चिमटा काढून गेली. वानगीदाखल या काव्यपंक्ती पहा;

"अंबरात बांधुनि वाडे
अंबरी नांदती किडे
राजा झाला कुणी एकला
दुजा गाजवी प्रधानकीला
तिसरा जागे रखवालीला
प्रजा बनोनी अवती भवती
असंख्य जमती किडे"

 परतंत्र हिंदुस्थान आणि ब्रिटिश सरकार यांच्या संदर्भातील 'पाळीव पोपटास' ही रूपकात्मक कविता त्या काळी फारच प्रक्षोभक ठरली. 'केसरी' सारख्या प्रमुख


सांगली आणि सांगलीकर.................................................. ११२