पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजीमधील अत्तमोत्तम काव्याचा, तसेच केशवसुतांच्या काव्याचाही, सखोल अभ्यास करता आला. तो त्याना भावी आयुष्यात फार फलदायी झाला. आचार्य अत्रे, कवी मायदेव यासारखे सहाध्यायी कॉलेजात होते. अशा परिस्थितीत काव्यविहारींच्या प्रतिभेला धुमारे फुटले नसते तरच नवल! अत्रे, मायदेवांच्या बरोबर ईष्येंने काव्यरचना करण्यात त्याना धन्यता वाटत होती.
 त्या काळी 'मनोरंजन' नावाचे मासिक होते. १९०० ते १९२० या काळात महाराष्ट्रात ललित वाङ्मयाबद्दल आवड व अभिरूची निर्माण करण्याचे मोठेच काम या मासिकाने केले. या मासिकाच्या पहिल्या पानावर कविता प्रसिद्ध होणे हे फार प्रतिष्ठेचे समजले जाई. गोविंदाग्रज, बालकवी, रेव्ह. टिळक अशा दिग्गजांच्या कवितानांच तेथे स्थान मिळे. अशा परिस्थितीत 'हसणारी कलिका' ही आपली कविता 'मनोरंजनच्या ' पहिल्याच पानावर आलेली बघून, काव्यविहारीना केवढा परमावधीचा आनंद झाला असेल! त्याच अर्मीत त्यानी 'कृष्णाकाठी' (या कवितेचा गौरवपूर्वक अल्लेख सांगलीमधील जुन्या स्टेशन चौकातील जाहीर सभेत यशवंतराव चव्हाण यानी केला होता.) 'आशानिराशा' व ‘तरंग' या कविता पाठविल्या आणि त्यांचेहि स्वागत झाले. सुरुवातीच्या काळात काव्यविहारींच्या कविता, प्रेम आणि प्रेमभंग, यासंबंधीच्या असत. याच संदर्भात आपल्या, ‘माझे वाङ्मयीन जीवन' या आत्मनिवेदनपर पुस्तकात त्यानी म्हटलं आहे की 'एका दूरस्थ तारकेचा ध्यास' त्याना काव्यप्रवण बनवत होता. गंमतीची गोष्ट म्हणजे प्रेमाच्या कविता लिहिताना त्या कविता डी.व्ही. गद्रे या रूक्ष नावाने प्रसिद्ध होत होत्या! ('काव्यविहारी' हे नाव साहित्याशी तसा संबंध नसणाऱ्या त्यांच्या एका मित्राने नंतर सुचविले) पुढे केशवसुतांच्या काव्याच्या अभ्यासामुळे, तसेच प्रा. वासुदेवराव पटवर्धन यांच्या प्रभावाने काव्यविहारी, आगरकरी संप्रदायाकडे व समाजसुधारणेकडे वळले. प्रेमकविता आपोआपच लोप पावली आणि तिची जागा सामाजिक कवितेने घेतली.

 एल.एल.बी.साठी मुंबईत केलेल्या अभ्यासाच्या वास्तव्यात, त्यांचा 'अद्यान' आणि 'नवयुग' या मासिकांशी संबंध आला. त्या मासिकातून त्यांच्या कविता येऊ लागल्या. बुधगावात, एल. एल. बी. पूर्ण करुन आल्यानंतर मात्र, त्यांची वैचारिक कुचंबणा होऊ लागली. एक तर पुण्या-मुंबईत जे मोकळे वातावरण अनुभवायला मिळायचे त्याचा लोप झाला. बुधगावसारख्या आडगावात काही वाचायला मिळायचं नाही. त्या काळात आजच्यासारखी सुलभ वाहतूक व्यवस्था नव्हती म्हणून ४-५ मैलांवरच असलेल्या सांगलीस येणे पण जमायचं नाही. आणि या सर्वात जिकिरीचे काम म्हणजे संस्थानची नोकरी ! म्हणजे तोंड असून बोलायचे नाही. कान असून ऐकायचे नाही, असा प्रकार! त्यातून काव्यविहारींसारखी त्या काळातील माणसं


सांगली आणि सांगलीकर.................................................................... .१११