पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अखेरच्या सोडलेल्या श्वासापर्यंत.
 १९११ साली त्यांच्या वाङ्मयीन जीवनाला सुरुवात झाली. बालपणीच म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षापासून तो दहाव्या वर्षापर्यंत, त्याना नाट्याचार्य देवलांचा सहवास घडला. संगमेश्वराच्या देवळात सांज-सकाळ होणारा घंटानाद, वेदशास्त्रसंपन्न ब्राम्हणांच्या घराघरातून ऐकू येणारा मंत्रघोष, या वातावरणाचे संस्कार देवलाना जिथे मोहवून गेले, त्या हरिपुरात काव्यविहारी नक्कीच प्रभावित झालेले असणार. त्याच काळात सुप्रसिद्ध लेखक ना. ह. आपटे हरिपुरात येत असत. त्यांच्या कथा- कादंबऱ्यांची विलक्षण मोहिनी काव्यविहारींच्या बालमनावर पडली होती. इतकी की त्यानी तोरो नावाच्या (पुढे अध्यात्माच्या मार्गाने कालक्रमणा करणारे सांगली शिक्षण संस्थेचे एक संस्थापक सदस्य, गुरुनाथ तोरो) मित्राच्या मदतीने 'कलियुग' नावाच्या कादंबरीचा आराखडासुद्धा तयार केला होता. त्या संदर्भात पत्ते खेळणाऱ्या चुलत- चुलत्यांची व त्यांच्या मित्रांची नावे जशीच्या तशी या कादंबरीच्या हस्तलिखितात आली होती. (निदान नावे बदलून लिहावे हा पोच बालवयात कसा असणार ? ) आणि वस्तुस्थिती अशी होती की ही मंडळी मौजेखातर खरोखरच दोन - चार पैसे लावून खेळत असत. झाले. वडिलधाऱ्यांच्या हाती ते कागद पडल्यावर काय झाले असेल ते सांगायला नकोच. काव्यविहारींची तीच पहिली आणि अखेरची कादंबरी !

 लहानपणी नाटकं बघितल्यावर, आणि देवलांशी गप्पागोष्टी झाल्यावर, नाटकातील चालींवर पदे किंवा मुखडे रचण्याचा त्याना नाद लागला. त्यानी खरी कविता अशी लिहिली, ती घरातील अंगणातच टवटवीत फुललेल्या जाईच्या वेलीवरील फुलाला उद्देशून. घरातच राहणाऱ्या देवलाना त्यानी ती दाखविली. देवलांना आवडली. त्यानी ‘आनंद’ मासिकाच्या वासुदेवराव आपटे यांजकडे पाठवली. (पुढे कॉलेजात गेल्यावर मात्र बी.ए. होईपर्यंत कविता न करण्याचा खरमरीत सल्ला देवलानी दिला. पण काव्यविहारीना तो मानवला नाही ही गोष्ट वेगळी.) 'आनंद' मासिकात 'फुलाची विनंती' म्हणून आलेली काव्यविहारींची हीच पहिली कविता. राजाराम कॉलेजात असताना त्यानी काही कविता केल्या. कॉलेजच्या मासिकात छापून आल्या. पण त्यांच्या खऱ्याखुऱ्या वाङ्मयीन जीवनाला सुरुवात झाली ती पुण्याला फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाल्यानंतरच. त्या काळात पुण्यात नुसता रहिवासी म्हणून राहण्यासारखे आणि त्यातून फर्ग्युसनचा विद्यार्थी असण्यासारखे दुसरे भाग्य नव्हते. लोकमान्य टिळकानी आणि त्यांच्या केसरीने राजकीय वातावरण भारून टाकले होते. देवल- खाडिलकरांची नाटके, गंधर्व मंडळी रात्र रात्र रंगवीत होती. फर्ग्युसनमध्ये रँग्लर परांजपे, भाटे, रा.द.रानडे (पुढील काळातील गुरुदेव रानडे) यासारखी विद्वान मंडळी होती. प्रा. पटवर्धनांसारख्या रसिक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, काव्यविहारीना


सांगली आणि सांगलीकर...................................................................... ११०