पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असे सकृतदर्शनी सुखदायक वातावरण होते तरी व्यावहारिक दृष्ट्या त्यांचे बालपण कष्टात गेले. ते अवघे पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे प्लेगने निधन झाले. घरात आई आणि सदा व नाना ही दोन धाकटी भावंडे होती. सुदैवाने स्वतःचे घर होते आणि मुख्य म्हणजे आईच्या मनगटात जोर होता. जिवापाड कष्ट करण्याची हिंमत होती. त्यांच्या चुलत चुलत्यानी या निराधार कुटुंबाला आधार दिला.
 काव्यविहारींचे प्राथमिक शिक्षण हरिपुरात झाले. दुय्यम शिक्षणाची सोय नसल्याने त्याना जवळच्या सांगलीत पायपीट करत हायस्कूलसाठी जावे लागे. त्यावेळचे सांगली हायस्कूल आताच्या आमराईच्या बाजूला नव्हते तर सध्याची कोर्ट भरतात त्या ठिकाणी होते. शाळेत ते हुषार विद्यार्थी म्हणून गणले जात. १९११साली ते 'स्कूल फायनल' पास झाले. त्या काळात तेवढ्या 'क्वालिफिकेशन' वर नोकरी मिळणे शक्य होते. घरच्या परिस्थितीमुळे काव्यविहारी नोकरीच्या खटपटीलाही लागले होते. मात्र एवढ्या हुशार विद्यार्थ्याने, एवढ्या लहान वयात नोकरीला लागावे ही गोष्ट, त्यावेळचे सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक वासुनाना खाडिलकर आणि देवधरशास्त्री याना पटेना. पुढील शिक्षणाचे मार्ग मोकळे व्हावेत, म्हणून त्या अभयतानी काव्यविहारीना एक वर्ष अभ्यास करून मॅट्रिकला बसण्याचा आग्रह केला, त्यानुसार १९१२ साली ते चांगल्या मार्कानी मॅट्रिक झाले. घरच्या गरिबीमुळे कॉलेजशिक्षणाचे स्वप्नही ते पाहू शकले नसते. पण अशा वेळी बुधगाव संस्थानचे अधिपती कै. बाबासाहेब पटवर्धन देवासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एक हुशार व होतकरु मुलगा म्हणून त्यानी काव्यविहारीना कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून ते थेट एल.एल.बी.पूर्ण होईपर्यंत स्कॉलरशिप दिली. या बहुमोल ऋणाचा काव्यविहारीना कधीच विसर पडला नाही. एरवी वकिलीच्या धंद्यात त्याना अमाप पैसा मिळविता आला असता. स्वतंत्र वृत्तीने राहता आले असते. पण तो काळ आणि त्या काळातील लोकांच्या निष्ठा खणखणीत होत्या. ज्यानी आपले शिक्षण पूर्ण केले त्या राजेसाहेबांशी काव्यविहारी कधीहि बेईमान झाले नाहीत बुधगावसारख्या आडगावात स्वतःला कोंडून, नोकरीची सर्व बंधने स्वीकारून त्यानी शेवटपर्यंत निष्ठेने नोकरी केली.

 १९१३ व १९१४ ही दोन वर्षे ते कोल्हापूरला राजाराम कॉलेजात होते. इंटर झाल्यावर बी.ए.च्या अभ्यासासाठी जानेवारी १९१५ मध्ये ते पुण्याला फर्ग्युसनमध्ये गेले. १९१७ साली बी. ए. झाल्यावर मुंबईस दोन वर्षे राहून, त्यानी एल.एल.बी. पूर्ण केले आणि तडक बुधगावकरांच्या संस्थानी सेवेत ते रूजू झाले. मामलेदार म्हणून नोकरीची सुरवात करून विविध पदांवर कामे करून १९४८ साली बुधगाव संस्थान खालसा व्हायच्या वेळी ते संस्थानचे प्रमुख न्यायाधीश बनले होते. दोन-चार वर्षे आधीच निवृत्ती घेऊन, त्यानी सांगलीत कायमस्वरूपी वास्तव्य केले, ते १९७५ साली


सांगली आणि सांगलीकर............................................................... .१०९