पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकट झाली आहे. आचार्य अत्रे, कवि मायदेव हे त्यांचे फर्ग्युसनमधील समकालीन कविमित्र. तिघेही बरोबरीने काव्यरचना करीत. कॉलेजच्या मासिकात पाठवत. आचार्य अत्र्यानी आयुष्यात अनेक माणसे जोडली आणि तोडली पण. मात्र काव्यविहारींशी तरूणपणी जडलेला स्नेह अत्र्यानी आयुष्यभर जपला. काव्यविहारींच्या सत्तरीच्या समारंभाच्या निमित्ताने आपल्या 'मराठा' मध्ये लिहिलेल्या लेखात त्यानी म्हटलय “कविवर्य गोविंदग्रजांच्या मृत्यूनंतर (जानेवारी १९१९) आणि रविकिरण मंडळाच्या अदयापूर्वीचा (१९२३) संधिकाळ, ज्या काही कवींनी आपल्या प्रतिभाबलाने गाजवला, त्यात काव्यविहारींचा प्रामुख्याने अल्लेख केला पाहिजे. सामाजिक बंडखोरी आणि राष्ट्रीय अत्थापन या केशवसुतांच्या दोन वैशिष्ट्यांचे, काव्यविहारीनी यथाशक्ति निष्ठेने अनुकरण केले. सुबोध धावती रचना, राष्ट्रीय भावनेची चेतावणी, जोरकस विचारांचा प्रवाह हे काव्यविहारींच्या काव्याचे अल्लेखनीय विशेष होत." आचार्य अत्रेंची गुणग्राहकता आणि रसिकता सर्वश्रुतच आहे. त्यानी स्वतः पुढाकार घेऊन काव्यविहारींचा “स्फूर्तिलहरी” हा काव्यसंग्रह, स्वतः च्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या एकूण खाक्याप्रमाणे, टोलेजंग समारंभ आयोजून प्रकाशित केला होता.
 आचार्य अत्र्यांसारख्या प्रचंड व्यक्तिमत्वाच्या महापुरूषाने, ज्याना गौरविले ते 'काव्यविहारी', आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी काव्यप्रेमी सांगलीकरांच्या मनात त्याना अढळ स्थान आहे.

 अशा रसिकमान्य काव्यविहारींचा जन्म सांगलीजवळील हरिपूर गावचा. १५ नोव्हेंबर १८९४ सालचा. नाटककार देवलांचा जन्म पण हरिपूरचाच. कृष्णा- वारणेच्या संगमावरील श्रीसंगमेश्वराचे प्राचीन मंदिर, त्याभोवतीचा निसर्गरम्य परिसर अशा वातावरणात काव्यविहारींचे बालपण गेले. आज कल्पना येणार नाही इतके त्या काळात हरीपूर रम्य ठिकाण होते. नदीच्या प्रवाहात तास न् तास पोहावे. नदीकाठच्या मळ्यातील कोवळी कोवळी मक्याची कणसं, बाजीरावाच्या थाटात खावीत. शेजारच्या सुप्रसिद्ध गणपती बागेतील चिंचेच्या घनदाट बनात शिरून चिंचा, बोरे, कवठे असा खुराक खात, मजेत हुंदडावे असे रम्य बालपण त्याना लाभले. सुदैवाने नाटककार देवलांचा मुक्काम काव्यविहारींच्या बालपणी बरेचदा हरिपुरात असे. त्यांचा सहवास मिळायचा. त्यांचे जेवणखाण काव्यविहारींच्या घरातच होत असल्याने त्यांच्या गप्पा ऐकायला मिळत. या वातावरणामुळे त्यांच्या ठिकाणी नंतर वाढीस लागलेल्या निसर्गप्रेमाची आणि काव्यप्रेमाची हातात हात घालून जडणघडण झाली. पुढे न्यायखात्याची रूक्ष नोकरी इमानेइतबारे करताना, कामाच्या निमित्ताने पंढरपूरजवळील निसर्गरम्य 'खंडाळी' येथे त्याना राहण्याचा योग येई, तेव्हा त्यांचे काव्यप्रेम आणि निसर्गप्रेम फाळून येई. त्याचे बीज या हरिपूरच्या बालपणातच रुजलेले होते.


सांगली आणि सांगलीकर.................................................................... १०८