पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केशवसुतसंप्रदायाचे अध्वर्यू
कवि काव्यविहारी



 बालगंर्धव आणि त्यांची गंधर्व संगीत मंडळी अवघा महाराष्ट्र दुमदुमून सोडत होती तेव्हाचा, म्हणजे १९१५-१६चा काळ. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल हे नाटकाच्या तालमी घेत असत. पुण्यात नाटकाचे प्रयोग असल्याने त्यांचा मुक्काम पुण्यात कंपनीच्या बिऱ्हाडी होता. एक अत्साही कॉलेजयुवक आपली कवितांची चोपडी घेऊन देवलाना भेटायला गेला. तिथे त्यावेळी राम गणेश गडकरीपण बसले होते. आपल्या एक दोन कविता त्या युवकाने देवलाना दाखविल्या. देवलांशी पूर्वपरिचय असल्याने तो युवक जरा जोशातच होता. 'इंद्रधनुष्य' आणि 'चंद्रोदय' या कवितांमधील काही पंक्ती अशा होत्या :

'नीलवर्णनभसरः सलिलगत शतकमळे फुलली' आणि
‘अमररमणीपादतलहतहंस म्हणुनि विहरे गगनी हा '

 बाणभट्टाच्या समासांची आठवण करुन देणारी भाषा बघून थोड्या रोषानेच देवल त्या युवकाला म्हणाले 'अरे बंडू, तू मराठी कविता लिहितोस की संस्कृत ? मराठी कविता लिहायची तर सोप्या, सुबोध भाषेत लिहीत जा.” नंतर जवळ बसलेल्या गडकऱ्याना ते म्हणाले, "कवितेच्या नादी लागून तुम्ही कॉलेज सोडलंत, तसंच हा मुलगाही कॉलेज सोडेल अशी मला भीती वाटते.” आणि मग त्या युवकाला समजावत ते म्हणाले “हे बघ, कविता लिहायची तर सर्वाना समजेल अशी लिही आणि हो, ही कवितेची वही माझ्याकडेच राहू दे. बी.ए. होईपर्यंत कविता करायच्या नाहीत. "
 हा युवक म्हणजेच कै. धोंडो वासुदेव गद्रे तथा 'कवि काव्यविहारी.' नाट्याचार्य देवलांची शिकवणूक आयुष्यभर त्यानी लक्षात ठेवली. त्यामुळे सुबोधता हा त्यांच्या कवितेचा ठळक विशेष बनला.

 'काव्यविहारी' ना केशवसुत संप्रदायाचे प्रमुख कवि म्हणून ओळखले जाते. त्याना स्वत:ला तसा त्याचा रास्त अभिमान होता. त्यांची केशवसुतांसारखी समाजसुधारणेची कळकळ, 'काव्यविहार' या कवितासंग्रहातील 'सवाल' सारख्या कवितांमध्ये प्रकर्षाने


सांगली आणि सांगलीकर.................................................................... .१०७