पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकाशवाणीवर बहिष्कार घातला. मधल्यामध्ये शास्त्रीय संगीताची आणि श्रोत्यांची गळचेपी होऊ लागली. ही स्थिती संगीतप्रेमी प्रो. रानडे याना सहन होईना. तेव्हा काही मान्यवर व्यक्तिंसमवेत, त्यानी मध्यस्थी करुन, दोघांमधील भांडण मिटवले. त्यामुळे कलाकारांचा योग्य मान राखला गेला. आणि श्रोत्यांची सोय झाली.
 या संगीतप्रेमी माणसाच्या मनाचा तंबोरा अितका 'सुरेल' लागलेला असे की संगीताच्या दुनियेतील कोणताहि 'बदसूर' त्याना क्लेशकारक होई. म्हणून तर त्यानी हे भांडण मिटवण्यात सिंहाचा वाटा अचलला.
 प्रो. ग.ह. रानडे ही अनवट रागातील अपरिचित 'चीज' आहे असे इतरजनांना भले वाटो.

 अस्सल संगीतषौकीन सांगलीकराना तसं कधीच वाटणार नाही!


सांगली आणि सांगलीकर.......................................................... . १०६