पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उभारणी, त्यानी इंग्रज सरकारशी केलेले स्वाभिमानाचे वर्तन, पुढे इंग्रज सरकारने त्यांचा केलेला अभूतपूर्व सन्मान आणि त्यानंतर त्यांनी सांगलीची केलेली सर्वांगीण सुधारणा, याचे सरस निवेदन लेखकाने केले आहे. शेवटी सांगलीकर व्यक्तिंचे गुणगान संपवताना लेखकाने भैरवी म्हणून मंगेशकर सुरांना अभिवादन केले आहे.

 पुस्तकाच्या अखेरीस काही परिशिष्टे आणि पुरके जोडली आहेत. त्यांतून सांगलीतील महत्त्वाच्या संस्थांची माहिती आणि कालपट जोडले आहेत. ही माहिती उपयुक्त आणि पूरक आहे.

 श्री. अविनाश टिळक यानी अत्यंत परिश्रमाने सर्वप्रकारची माहिती एकत्र करुन हा एक ग्रंथ सर्वस्पर्शी केला आहे. नगर, वास्तू आणि नामवंत व्यक्ती यांची परस्परसंवादी आणि पूरक अशी रचना विचारपूर्वक आणि जातिवंत रसिकतेने केली आहे ती 'सांगली बहु चांगली' या प्रशस्तीची सार्थकता पटवून देणारी आहे. नगरीपेक्षा नामवंत व्यक्तींवर अधिक भर दिला आहे तो एक प्रकारे योग्यच म्हणावा लागेल. त्यात काही प्रमुख साहित्यिक, कार्यकर्ते, उद्योगपती, राजकीय नेते, क्रीडापटू आहेत आणि अन्य सांगलीकरही आहेत.

 सांगली नगरवाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे मान्य करून वाचनालयाच्या परंपरागत व्यवहारात एक नवी वाट पाडली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. सुबुद्ध, रसिक सांगलीकर आणि सांगलीप्रेमी वाचक या ग्रंथाचे स्वागत करतील आणि ग्रंथकारास धन्यवाद देतील असा विश्वास वाटतो.

'निर्वेद', विश्रामबाग; सांगली.
प्रा. म. द. हातकणंगलेकर
 

१ फेब्रुवारी २००१

आठ