पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तंबोऱ्यांचा एकत्रित आवाज त्याना त्यासाठी ऐकायचा होता. मग त्यानी काय करावे? आपल्या दोन्ही लहान मुलांना ( एक दहा वर्षाचा आणि दुसरा आठ वर्षाचा) त्यानी दोन तंबोरे २०-२५ मिनिटे वाजवत बसायला लावले. दोन्ही तंबोरे वाजायला लागले की दूर जाऊन ते स्वतः नीटपणे त्यांचे आवाज, एकत्रित आवाज, ऐकत. एक-दोन मिनिटे लक्षपूर्वक ऐकून पुन्हा जवळ येऊन, दोन्ही तंबोऱ्यांची त्याना पाहिजे तशी जवारी (गुढी । घोडीवरील सूत) किंवा गुढीखालील मणी, थोडा फार मागेपुढे करीत. एखादी खुंटी सैल करत. घट्ट करत. हा कार्यक्रम निदान अर्धा पाऊणतास चाले. मुलं रडकुंडीस येत, मग आई बिचारी खायला काजू नाहीतर जर्दाळू देऊन त्यांचे सांत्वन करी !
 फिजिक्सचे प्रोफेसर असेही 'प्रयोग' करीत.
 त्यांच्या अशा अनुभवसिद्ध लिखाणाने त्याना संगीतक्षेत्रात मोठाच नावलौकिक मिळाला. इचलकरंजी, बुधगांव, सांगली संस्थानांचे अधिपती त्यांचा योग्य तो मुलाहिजा राखत असत. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी इचलकरंजीकर बाबासाहेब घोरपडे यानी रु.१०१/- चा पुरस्कार दिला होता. (१००० प्रतींच्या या पुस्तकाचा एकूण छपाईखर्च रु.३२५/- झाला होता हे इथं लक्षात घ्यायला हवं!) एकदा हिराबाई बडोदेकरांचा सांगलीच्या सदासुख थिअटरमध्ये तिकिट लावून जलसा होता. सांगलीचे राजेसाहेब तेथे कार्यक्रमाला पोचले. गेल्याबरोबर आधी त्यानी प्रो. रानडे कार्यक्रमाला आले आहेत का नाहीत याची चौकशी केली. ते आलेले नाहीत, असं कळल्यावर लागलीच एक खास सांडणीस्वार पाठवून त्याना बोलावून घेतले!.
 १९४० मध्ये त्यांची डे. ए. सोसायटीच्याच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बदली झाली. पुण्याचे वास्तव्य त्यांच्या संगीतगुणाना फारच पोषक ठरले. पुण्याला आल्यावर त्यांचा विनायकबुवा पटवर्धन, गजाननबुवा जोशी, केशवराव भोळे, मिराशीबुवा, आबासाहेब मुजुमदार अशा संगीतक्षेत्रातील मातब्बर व्यक्तींबरोबर संबंध आला. प्रो. रानडे यांचे कार्यक्षेत्र त्यामुळे बरेच विस्तारले. पं. मिराशीबुवांबरोबर त्यांचा पूर्वीचा स्नेह अधिकच वृद्धिंगत झाला. दोघांच्या गाठीभेटीतून अनेक योजना निघाल्या. मिराशीबुवांच्या चीजांचे तीन भाग प्रो. रानडे यानी १९४४ ते १९५१ च्या दरम्यान संपादित केले. पुढे १९५२ ते १९६१ पर्यंत, मिराशीबुवांच्या बैठकीच्या स्वरुपात संपूर्ण विस्ताराचे गाणे लिहिलेल्या पाच भागांची प्रसिद्धी केली. त्याचबरोबर पंडित विनायकबुवा पटवर्धन यांची खाजगी संगीत संस्था,
सांगली आणि सांगलीकर................................................................... . १०३