पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेण्याचा योग, फारच अशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या २७ व्या वर्षी आला, हे सुद्धा थोडेसे नवलाचेच म्हणावे लागेल. १९२४ साली सांगलीत येऊन राहिलेल्या, गणपतीबुवा भिलवडीकर यांच्याकडे, त्यांचे संगीताचे शिक्षण सुरु झाले. कॉलेजात प्राध्यापक असलेले रानडे गणपतीबुवांकडे त्यांच्या विद्यार्थीवर्गात बसून शिकू लागले. त्यांची कुशाग्र बुद्धि, जिज्ञासा, आणि शिक्षण घेण्याची तीव्र अिच्छा बघून, गणपतीबुवा त्याना स्वतंत्रपणे शिकवायला लागले. खुद्द रानडे यानी खूप गुरुसेवा केली व गाणे शिकण्यासाठी परिश्रम घेतले. हे गणपतीबुवा ग्वाल्हेरगायकी महाराष्ट्रात रुजवणाऱ्या पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे ज्येष्ठ शिष्य. गणपतीबुवांचे १९२७ मध्ये निधन झाल्यावर प्रो. रानडे, बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य प्रसिद्ध गवई गुंडुबुवा इंगळे, यांच्याकडे पुढील शिक्षण घेऊ लागले. पण रानडे यांचा आवाज गायनास अनुकूल नव्हता. कदाचित संगीत - शिक्षणास प्रारंभ अशीरा केला या कारणाने पण असेल. त्यामुळे अत्तर आयुष्यात जरी त्यानी गाण्याचा छोट्या-मोठ्या बैठका केल्या, मुंबई आकाशवाणीवरुन गाण्याचे कार्यक्रम केले, तरी गाण्याचा आविष्कार हा आपला प्रांत नाही असे त्यानी कदाचित् मनोमनी ठरविले असावे. याअलट त्याना लेखनाची हौस होती. मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळे त्यानी संगीत-विषयक वाचन, संशोधन आणि लेखन यावरच आपली सर्व शक्ती केंद्रित केली.
 त्याकाळी सुप्रसिद्ध लेखक आणि संगीताचे षौकीन, प्रो. ना. सी. फडके कोल्हापुरात 'झंकार' मासिक चालवत असत. त्यामध्ये 'संगीतातील नवमतवाद' ही लेखमाला चालू होती. प्रा. रानडे यांच्या घरी गाण्याच्या छोट्या-मोठ्या बैठका होत. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मंडळींबरोबर या लेखमालेविषयी चर्चा होत. सांगलीतील कवि साधुदास, नाटककार कमतनूरकर, दत्तुबुवा भोसले, म्हैसकरबुवा अशी संगीताची जाणकार मंडळी येत; कधीकधी त्याकाळात सांगलीत वास्तव्य असणारे मा. दीनानाथ पण येत असत. प्रो. रानडे यांचे घर याबाबतीत, नंतर पुण्यात गाजलेल्या रविकिरण मंडळासारखेच झाले होते. त्यांच्या पत्नी सुमतीबाई, अगत्याने सर्वांचे चहा-पाणी, जेवणखाण करीत. प्रो. रानडे यांचे लेख पुण्याच्या 'भारतीय संगीत' या द्वैमासिकात येऊ लागल्यावर त्यांचे वर्तुळ आपोआपच वाढले. मा. कृष्णा (फुलंब्रीकर), वझेबुवा अशी मातब्बर मंडळीपण येऊ लागली. रानड्यांच्या घरातील सुग्रास पदार्थांची त्याना एवढी सवय झाली, की संकोच गेला, तेव्हा आपणहून आल्याबरोबर ही मंडळी 'पहले खाना, फिर गाना' असे म्हणत. मिरजेची तंतुवाद्ये बनवणारे मुसलमान कारागीर पण येत असत.
सांगली आणि सांगलीकर...................................................................... .१०१