पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मधले. कोकणातील अितर अनेक नामवंत चित्पावन घराण्यांप्रमाणे, त्यांचे पूर्वज नशीब काढण्यासाठी देशावर आले. रानडे यांचे वडील मिरज संस्थानात नोकरीस होते. त्यांचे आजोळ सांगली येथील प्रसिद्ध ओक-फडणीस घराण्यातील. रानडे यांचे आई-वडील लहानपणीच निवर्तले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण आजोळीच झाले. त्यांचे आजोबा भाऊसाहेब फडणीस हे प्रख्यात बुद्धिबळपटू तर होतेच पण संस्थानिक, सांगलीकर राजेसाहेब यांचेबरोबर घरोबा असलेले प्रतिष्ठित गृहस्थ होते. सांगलीतील सुप्रसिद्ध राजवैद्य आबासाहेब सांबारे आणि प्रख्यात संत तात्यासाहेब कोटणीसमहाराज, यांच्या निकटवर्तियांत त्यांची गणना होत असे. त्यामुळे रानडे आपल्या या फडणीस आजोबांबरोबर अभयतांच्या घरी गायन- कीर्तन-भजन इत्यादि कार्यक्रमांस जात. आबासाहेबांकडे तर अल्लादियाखाँ, अब्दुल करीम खाँ यांजसारखे मोठमोठे गवई येत. त्यामुळे शास्त्रीय संगीताबद्दलचे आकर्षण रानड्याना बालपणापासून आपसूकच निर्माण झाले. कान आपोआप तयार होत गेला.
 रानडे यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील मराठी शाळा क्र. १ मध्ये झाले तर हायस्कूल शिक्षण सांगलीतील सरकारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे घराजवळच संस्कृतशास्त्री पंडित ग्रामोपाध्ये राहात. त्यांच्यामुळे रानडे यांचे संस्कृत शिक्षण अत्तम तऱ्हेने झाले.
 सांगलीत त्यावेळी कॉलेज शिक्षणाची सोय नसल्याने ते पुण्याला फर्ग्युसनमध्ये दाखल झाले. १९१५-१९१९ या काळात तेथे शिक्षण घेऊन ते बी.एस.सी. झाले. त्याच काळात प्रख्यात तत्त्वज्ञानी संत गुरुदेव रानडे तेथेच इंग्रजीचे प्रोफेसर होते. ते या गणपतराव रानडे यांचे नात्याने चुलते. त्यांच्या मार्गदर्शनाने गणपतरावाना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता आले. त्यांच्या पुढील आयुष्यात त्याना या संस्कृत-इंग्रजी भाषेचा फार अपयोग झाला.
 कॉलेजशिक्षणानंतर रानडे सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये नोकरीला लागले. थोड्याच काळात, त्यावेळी सांगलीत नव्यानेच सुरु झालेल्या विलिंग्डन कॉलेजात, फिजिक्स विषयाचे प्रोफेसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२० ते १९४० या काळात त्यानी सांगलीतच अध्यापनाचे काम केले.

 एकीकडे संगीताची श्रवणभक्ती चालू होती. लहानपणी, कोटणीसमहाराजांच्या घरातून निघणाऱ्या पालखीपुढे गाणे म्हणणे, एवढाच गाण्याचा असा त्यांच्यावर संस्कार होता पण प्रत्यक्ष गुरुजवळ बसून पारंपारिक पद्धतीने संगीताचे शिक्षण


सांगली आणि सांगलीकर............................................................... १००