पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत.....सुवर्णतुलेच्या दानाने त्यांनी समाजाचे ऋण अत्कृष्ट तऱ्हेने फेडले आहे. "
 दादासाहेब वेलणकर यानी चार आणे मजुरीपासून सुरुवात केली. व्यापारातील सचोटी, चिकाटी आणि हातोटी या त्रिगुणांवर ते कुठच्या कुठे जाऊन पोहोचले. रोम काही एक दिवसात बांधले गेले नाही! त्यांचा विलक्षण काटकसरीपणा, मिळालेला फायदा पुन्हा धंद्यातच घालून तो वाढविण्याची त्यांची सततची धडपड, बाजारपेठेचे ज्ञान, तदनुरुप मालाची अत्पत्ती यामुळेच वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येनंतर ते आपले 'रोम' बांधू शकले. या कालावधीत त्यांनी तीन हजारावर मजुरांना शिकवून तयार केले. त्यामुळे सांगली हे एक विणकाम व सूत केंद्र बनले. पाठोपाठ चार सुताच्या गिरण्या अभ्या राहिल्या. जवळच्या इचलकरंजीला सहस्त्रावधी यांत्रिक माग व त्याचे चौपटीने हातमाग कारखाने सुरु झाले. त्यांच्या लाकडी वळकटीच्या (बीम) युक्तीने लहान लहान कारखान्यांचे जाळे पसरले. ह्या धंद्यात ठामपणे अभे राहून यश संपादन करता येते, हा विश्वास श्रीगजाननमिलच्या यशाने, अनेकांच्या मनात जागृत झाला. हँडलूमवर चालणारी पातळे ही पॉवरलूमवर आणायची पहिली कल्पना त्यांचीच आणि सर्व प्रथम राबवली त्यानीच. तोवर भारतात पॉवरलूमवर पातळे निघाली नव्हती. त्याच्यावर रुईफुलासारख्या बॉर्डर्स त्यानी बसविल्या. टेक्स्टाईल इंडस्ट्रीत अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यानी यशस्वी केल्या.
 सांगली नगरीला औद्योगिक क्षेत्रात नाव मिळवून देण्याचे, दिगंत कीर्ती मिळवून देण्याचे त्यांचे श्रेय फार मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सांगलीच्या राजेसाहेबानी १९४७ मध्ये त्याना 'अद्योगरत्न' ही पदवी दिली पण त्यांची ओळख महाराष्ट्राला 'धनी वेलणकर' म्हणूनच झाली होती. हा गौरवशाली शब्द त्यांच्याविषयी आदराने बोलताना, १९३८ साली, स्वातंत्र्यवीर सावरकरानी प्रथम अच्चारला. त्या थोर पुरुषाची वाणी १९४८ च्या सुवर्णतुलेनंतर अधिकच सार्थ झाली. सात्विकतेने मिळवलेल्या संपत्तीचे 'धनी' म्हणून त्या संबोधनाला एक प्रतिष्ठा आहे.
 आजहि 'धनी' शब्द अच्चारला की सांगलीकरांच्या तोंडी अत्स्फूर्तपणे 'वेलणकर' हेच नाव येते.
 ही ओळख केवढी हृद्य आणि प्रत्ययकारी आहे!

●●●

सांगली आणि सांगलीकर......................................................................... .९८