पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपल्या या आगळ्यावेगळ्या वानप्रस्थानाश्रमातसुध्दा त्यांनी आयुष्याचे मिनिट अन् मिनिट कारणी लावले. कानानी ऐकायला कमी येऊ लागले ही त्याना एकप्रकारे अिष्टापत्तीच वाटली. त्यानी म्हटलय की “कान सोडून गेल्यामुळे माझं लिखाण चांगलं व्हायला लागलं, एकाग्रता साधू लागली.” या अतारवयात त्यांनी थोडीथोडकी नाहीत तर चांगली १४ पुस्तके लिहून काढली. आपल्या अद्योगविषयक अनुभवांवरुन ‘यांत्रिक मागवाला,' ‘कारखानदार कसा झालो' अशी पुस्तके लिहिलीच. पण वृध्दापकाळात भेडसावणाऱ्या समस्यांचा शोध घेत 'वृध्दांची स्वास्थ्यसाधना' 'माझे वृध्दपण' सारखी पुस्तके लिहली. जपानच्या प्रवासाच्या अनुषंगाने 'जपानच्या प्रवासाची शिदोरी', तेथील लोकांची शालीनता पाहून प्रभावित होऊन, 'जगात वागावे कसे?' यांसारखी व काही धार्मिक पुस्तके त्यांच्या हातून लिहून झाली. 'जगात वागावे कसे' या पुस्तकाच्या तर अनेक आवृत्या निघाल्या. एका कारखानदारी करणाऱ्या माणसाची ही वाङ्मयसेवा पाहून जातिवंत साहित्यिकसुद्धा आश्चर्याने तोंडात बोटे घालतील. त्यांची ज्ञानलालसा विलक्षण होती. काहीही चांगले वाचले की ते त्याच्या नोट्स काढत. अमूल्य माहिती, सुभाषिते टिपून ठेवत. अशा अनेक वह्या त्यांच्या संग्रही होत्या.
 व्यायाम हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. अखेरपर्यंत त्यांची योगासने, नियमित व्यायाम टिकून होता. आयुष्यातील अनेक आघात पचवायला त्यांच्या शरीरबलाने त्यांना फार मदत केली. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. १९४८ सालच्या जळितासारखे प्रचंड गंडांतर, या मनोबलावरच त्यांनी पचवले. अनेक कुस्तिगीरांना, व्यायामपटूंना त्यानी आर्थिक मदत केली.
 त्यांचा पिंड हा मानवतावादी होता. ते हाडाचे देशभक्त होते. मूर्तीपूजेकडे आवश्यकतेपेक्षा अधिक लक्ष देत बसल्याने, चालता बोलता जो माणूस आहे, त्याच्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे, याची त्यांना स्वतःला जशी ठाम जाणीव होती तशीच ती अितराना करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. या जाणिवेपोटीच त्यांनी समाजपयोगी संस्थांना, व्यक्तींना देणग्या दिल्या.
 वयाची ९१ वर्षे पूर्ण केल्यावर वृध्दापकाळामुळे २१ एप्रिल १९७८ रोजी त्यांचे निधन झाले.
 त्यांच्या सुवर्णतुलेच्या समारंभप्रसंगी सांगलीच्या राजेसाहेबांनी म्हटले होते की “श्रीगजाननमिलचे भव्य दृश्य व त्याचे धनी वेलणकर आपणास आज दिसतात पण हे दृश्य निर्माण करण्यासाठी पूर्वी येथे जी पडकी जागा होती, त्या जागेमध्ये कार्याचे वेड लागल्यामुळे, या कार्याची रात्री बेरात्री योजना करीत हिंडणारे व दुःखे सोसणारे वेलणकर आपणास माहीत नाहीत पण ते 'वेलणकर' मला माहित
सांगली आणि सांगलीकर................................................................ .९७