पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नजरेला केवढे भव्य दृश्य, सुवर्णतुलेच्या प्रसंगी दिसले असेल?
 सुवर्णतुलेच्या निमित्ताने नाही म्हटले तरी संपत्तीचे थोडे प्रदर्शन समाजाला झालेच. नुसते दर्शन नेहमीच होत होते. पण थाटामाटाच्या समारंभाने काही मंडळींची डोकी असुयेने, मत्सराने पेटून निघाली हे निश्चित ! ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद जाणुनबुजून पसरवला जात होता. वेलणकर पडले ब्राह्मण कारखानदार; त्यातच महात्मा गांधींचा खून करणारा मारेकरी जातीने ब्राह्मण निघाला. गांधीहत्येनंतर जी दंगल माजली त्याची फार मोठी झळ श्रीगजाननमिलला पोचली. सुरुवातीला त्याचे वर्णन आले आहेच. त्या काळातील सरकारी आकड्यानुसार अंदाजे रु.२० लाखाचे वर नुकसान म्हणजे आजच्या काळातील ८-१० कोटीचे वर होईल. केवढा जबरदस्त फटका!
 खरं म्हणजे वेड लावणारीच परिस्थिती होती. पण सच्च्या लढवय्याला शत्रूने चारी बाजूने घेरुन टाकल्यावरच खरे स्फुरण चढते. दादासाहेबांचे तसेच झाले. त्यांची पाठ जमिनीला लागावी म्हणून मत्सराने पेटलेल्या समाजकंटकांची पाशवी अिच्छा, त्यांच्यासारखा जातिवंत पैलवान थोडीच पुरी होऊ देणार? सगळी मरगळ एका झटक्यात बाजूला टाकून दादासाहेब कामाला लागले. वेडेवाकडे, अर्धवर्तुळाकार झालेले पत्रे, सरळ करायच्या प्रयत्नात त्यांनी चक्क तशा प्रकारचे यंत्रच तयार केले. अग्निप्रलयातून वाचलेल्या साधनसामुग्रीचा अंदाज घेतला. ते स्वतः आपत्काली अपयोगी पडावे म्हणून नियमितपणे शिल्लक बँकेत टाकत, ती रक्कम, संरक्षक निधी म्हणून मदतीस आली. मुंबईत घेऊन ठेवलेल्या चाळी विकल्या. एवढे मोठे गंडांतर येऊनसुद्धा त्यानी नेहमीप्रमाणे वेळेवर कामगारांचे पगार केले. मालकाची जिद्द पाहून सर्वानाच स्फुरण चढले. हळूहळू कारखाना कामाला लागला. पूर्वस्थितीला येऊ लागला.......
 दादासाहेबांचे वय आता ६६-६७ वर्षाचे झाले. चिरंजीव रामराव बी. कॉम. होऊन कर्तेसवरते झाले होते. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक जाचक अटींमुळे दादासाहेब वैतागून जात; तेव्हा आता कारखान्याची संपूर्ण जबाबदारी रामरावांच्या खांद्यावर टाकून त्यांच्या कर्तृत्वाला धुमारे फुटू द्यावेत अशा भावनेतून दादासाहेबांनी समारंभपूर्वक दि. २० सप्टेंबर १९५३ रोजी, ४५ वर्षे अपत्यवत जपणूक केलेली श्रीगजाननामिल रामरावांच्या स्वाधीन केली.
 इथे दादासाहेबांच्या आयुष्याचा एक मोठा अध्याय संपला.
 यापुढे कारखान्याच्या कारभारात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप त्यांनी कधी केला नाही; मात्र दैनंदिन व्यवहाराशी ते संबंधित राहिले. त्यामुळे योग्य सल्लामसलत देण्यात त्यांना कधी अडचण आली नाही.
सांगली आणि सांगलीकर......................................................................... .९६