पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालता बोलता इतिहास आहे. नाट्यनिकेतनची त्यानी ३३ वर्षे सेवा केली. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांची लोकप्रियता अबाधित होती. आजही ते ताठ मानेने आठवणींच्या विश्वात जगत आहेत.

 सांगलीचे सर्वात मोठे कर्तेकरविते म्हणजे वसंतराव पाटील. त्यांच्याशिवाय सांगलीकर सुपुत्रांचा इतिहास पूर्ण होणार नाही. त्यांचे सारे कर्तृत्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे. त्याचा समर्थ आढावा श्री. टिळकानी घेतलेला आहे. कै. वसंतदादा हे सांगली भागातले राष्ट्रविख्यात व्यक्तिमत्व होय. सांगलीचे भाग्यविधाते. वसंतदादा यांच्या आयुष्यातील नाटयपूर्ण घटना लेखकाने अनुरुप शैलीत मांडल्या आहेत. त्यांच्या राजकीय जीवनातील कर्तृत्व आणि यशाची चढती कमान यांचाही आलेख चित्रित केला आहे. त्यानी केलेल्या कामाचा पसारा तपशीलाने दिग्दर्शित केला आहे. दानचिंतामणी राजमतीअक्का, क्रीडाक्षेत्रातील जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू विजय हजारे आणि बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, बुद्धिबळपटू भालचंद्र म्हैसकर, मल्लविद्येचे द्रोणाचार्य हरि नाना पवार, समर्थ कथाकार श्री. दा. पानवलकर या सर्वांच्या जीवनाचे आणि कर्तृत्वाचे ठसठशीत दर्शन श्री. अविनाश टिळकांनी घडविले आहे. त्याचप्रमाणे सय्यद अमीन या सांगलीतील साहित्यिकाचाही समावेश या मालिकेत केला आहे. ते एक सालस आणि संत प्रवृत्तीचे गृहस्थ होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार श्री. अमीन यानी आपल्या लेखणीने आणि वाणीने आयुष्यभर केला. संस्कृतचे नामवंत शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर यांचे ते आवडते विद्यार्थी होते. ते सांगली नगरपालिकेचे नियुक्त सभासद होते. पुणे विद्यापीठाच्या कोर्टाचे सदस्य होते. 'पी.ई.एन' या आंतरराष्ट्रीय लेखकसंघाचे ते सभासद होते. त्यानी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. ते अत्यंत साधेपणाने राहत असत. त्यानी एकूण १६ ग्रंथ लिहिले. त्यात संशोधनात्मक चरित्रे आणि धार्मिक साहित्य होते. इस्लाम, इस्लाम आणि नीतिशास्त्र, इस्लाम आणि संस्कृती हे त्यांचे प्रमुख ग्रंथ. हिंदू-मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. अकबर, पैगंबर यांची चरित्रे त्यानी लिहिली. तसेच छत्रपती शिवाजींचे चरित्रही लिहिले. ही सर्व पुस्तके त्यानी स्वखर्चाने प्रसिद्ध केली. ६८ व्या वर्षी सिटी बसच्या धक्का लागून त्यांचे अपघाती निधन झाले.

 सांगलीचा जन्मदाता चिंतामणराव पटवर्धन यांच्या जीवनदर्शनाखेरीज ही सांगलीकरांची मालिका पूर्ण झाली नसती. चिंतामणरावानी सांगलीला नवा चेहरा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्याची पूर्वपीठिका लेखकाने आस्थेवाईकपणे व साद्यंत सादर केली आहे. गणेशदुर्ग, गणपतीमंदिर यांची

सात