पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे; त्यामुळे रंगखात्याच्या कामात पाणी नाही म्हणून कधीही व्यत्यय आला नाही. या वास्तूच्या शेजारून जुन्या काळातील सांगली-मिरज रेल्वेचा फाटा जात होता. त्यामुळे आपोआपच कारखान्याची जाहिरात होण्यास मदत झाली. १९२२ साली ताब्यात आलेल्या या जागेवर कारखान्यास योग्य अशी बांधकामे झाल्यावर, १९२५च्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर, श्रीगजाननमिल्सची यंत्रे स्वतःच्या वास्तूत कार्यरत झाली तेव्हा विष्णुपंत वेलणकरांचा, (आता ते दादासाहेब म्हणून सर्वमान्य झाले होते) आनंद गगनात मावेना. लिंब-पुणे या ठिकाणचे अपयश आणि ते सर्वस्वी झाकून टाकणारे सध्याचे सुयश याची वारंवार मनात तुलना होऊन त्याना गहिवरुन येई.
 यानंतर जुन्या लुगड्यांच्या जागी नव्या पातळांची निर्मिती सुरु झाली. पारंपारिक गोमेकिनारीऐवजी रुईफुल, वेल वगैरे अनेक तऱ्हेचे काठ घातले. १४ वर्षानंतर 'मनमोहक पातळे' या नावाने मार्केटमध्ये आलेले हे अत्पादन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. किनारींच्या नक्ष्यांसाठी चमक वापरल्यावर तर पातळाना आणखीनच देखणेपणा आला. पातळांचा खप वाढतच राहिला.
 १९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले. तेथील वस्त्रोद्योगाचे त्यांनी सूक्ष्मपणे निरीक्षण केले; तेथील यंत्रे आणवून स्वतः कशी जोडायची ते शिकून, जपानी तज्ञांकडून सर्वांना कारखान्यात शिकवून दादासाहेबांनी वल्कली कापडांची निर्मिती सुरु केली. ती खूपच किफायतशीर ठरली. एकप्रकारच्या गवतासारख्या वनस्पतीपासून हे कापड बनवतात म्हणून दादासाहेबानी आपल्या परंपरेला साजेसे 'वल्कली' हे नाव त्याला दिले होते.
 १९१२ साली तीन मागांवर सुरु केलेला हा कारखाना १९४७ पर्यंत म्हणजे गांधीहत्येनंतर जळितात आहुती पडण्यापूर्वी ३०० माग, ८००० चात्या, स्वत: ची दहा एकर जमीन, विहीर, विविध खाती, नोकर लोकांसाठी चाळी असे मिळून अडीच लाख चौरस फूट बांधीव इमारत अशी कारखान्याची भक्कम स्थिती झाली आणि हे सगळं वैयक्तिक प्रयत्नांवर. ( भागीदारी, शेअर होल्डर्स, न घेता) ही भरभराट दादासाहेबानी योजनापूर्वक, अगदी कागदावर गणित मांडून घडवून आणली हे विशेष. तीन माग चालू राहिले तर जेवढा नफा होतो त्यातून सावकारी कर्ज, देणी दिल्यावर एक नवीन माग घेता येतो का हे ते सातत्याने अजमावत राहिले; तशी शक्यता दिसल्यावर त्यांनी अखादा आवडीचा छंद जोपासावा तसा हा माग खरेदीचा छंदच, म्हणा हवं तर, जोपासला. आणि असे करत करत मागांचे त्रिशतक गाठले! मात्र असे भरभक्कम यश मिळवायचे तर मूळ माणूस विलक्षण संयमी, मेहनती हवा. चार पैसे हातात आल्यावर त्याची हवा डोक्यात शिरायला नको की वेगळे रंगढंग सुचायला नकोत. तीनशे माग झाल्यावर त्यातील २२० माग सुती कापडासाठी तर ८०
सांगली आणि सांगलीकर....................................................................... .९३