पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंतर्गत कलहाने विष्णुपंतही वैतागले होते. स्वातंत्र्य नसल्याने त्याना मनासारखे प्रॉडक्शन काढता येईना की विक्री करता येईना. सांगलीकर राजेसाहेबांचे आणि अभ्यंकराचे काही तरी नाते होते; त्याआधारे विष्णुपंत राजेसाहेबाना भेटले. त्याच वेळी आणखी एक दुर्घटना घडली होती. त्यांचे सावकार भट ज्या बँकेत ठेवी ठेवत असत ती बँक बुडाली. त्यामुळे त्यांचेकडून मिळणारे भांडवल बंद झाल्यामुळे नोकरांचा पगार देणे पण जमेना. सांगलीकर राजेसाहेब प्रागतिक विचारांचे, अद्योगधंद्याला प्रोत्साहन देणारे राजे होते. त्यानी विष्णुपंताना आवश्यक तितके पैसे दिलेच आणि वर “कारखाना सांगलीस घेऊन या, माझ्या नगरीला शोभा आणा" असे आग्रहाने सांगितले आणि विष्णुपंतानी खरोखरीच सांगलीस स्थलांतर केले.
 सांगलीतील पदापर्णाचा दिवस होता, ७ मार्च १९१४. सर्वत्र गुढीपाडवा असल्याने गुढ्या-तोरणे अभारलेली होती. विष्णुपंतानी आणि सहकाऱ्यानी ते आपले स्वागतच समजून आनंद मानला. पण खरोखरच भविष्यकाळात त्यांच्या यशाची गुढी या सांगलीतच अभी राहायची होती!
 इजा, बिजा, तिजा या न्यायाने लिंब, पुणे आणि आता सांगली. दरबारी लोकांच्या संमतीने गणपती मळ्यातील जागा कारखान्यासाठी पसंत केली होती. ही जागा सांगली-हरिपूर रस्त्यावर होती. निसर्गरम्य परिसर होता. रामभाऊ द्रविडांच्या रुपाने कारखान्याला एक हितकर्ता मित्रच लाभला. त्यांचे व्यवहारातील कौशल्य आणि विष्णुपंतांचे यंत्रकामातील सूक्ष्म ज्ञान, यामुळे कारखान्याची भरभराट होऊ लागली. गणपती मळ्यात दोन-तीन सोपे बांधून रंगखाते सुरु झाले होते. रुद्राप्पा ज्ञानाप्पा हातपाकी यांजसारखे सहकारी लाभल्यामुळे मनासारखी रंगणी करुन घेता येऊ लागली. मागील अनुभवांवरुन शहाणे होऊन आता एकाच तऱ्हेच्या मालाची (पातळांची) निर्मिती होत होती; सर्व कारखानदार राडीचा (चिखलासारखा पातळ व दिसावयास पिवळसर असा जर्मन रंग) रंग लुगड्याना तांबडा रंग देण्यासाठी वापरत. त्या काळात धाडस करुन नॅपथॉलचे महागडे रंग वापरण्यास श्रीगजाननमिलने सुरवात केली. त्यामुळे लुगड्याचा काठ चमकदार दिसे. म्हणून मार्केटमध्ये मालाला सतत मागणी राहिली. तीन मागाचे दहा माग झाले. कारखान्याचा पसारा वाढू लागला. तशी कारखान्याला स्वतःची जागा असावी हा विचार पुढे आला. सांगली दरबारचे कर्ज अमाने अितबारे फेडल्याने, राजेसाहेबाना विष्णुपंतांच्या स्वच्छ व सचोटीच्या व्यवहाराची पूर्ण कल्पना आली होती; त्यामुळेच विष्णुपंताना हवी असणारी (सध्याची) दहा एकराची जागा राजेसाहेबांच्या मंजुरीने कारखान्याच्या ताब्यात आली. ही जागा अत्यंत यशदायी ठरली. या परिसरातील विहीरीला जिवंत पाणी
सांगली आणि सांगलीकर.................................................................... .९२