पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मध्यंतरीच्या काळात घरच्या मंडळीनी विष्णुपंतांच्या अिच्छेविरुध्द त्यांचे लग्न लावून दिले. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे. म्हणजे आता एकाच्या ऐवजी दोन परावलंबी जीव ! पोटाला काही तरी मिळवायला हवं म्हणून ते सोलापूरच्या कापड गिरणीत 'बॉबिन बॉय' म्हणून नोकरीला राहिले. नोकरी करता करता फावल्या वेळात ते यंत्रमागाचे शिक्षण घेत. कारण एकूण अनुभवावरुन, आता हातमागावर काम न करता यंत्रमागावरच करायचे असे त्यानी निश्चित केले होते.
 एका बाजूला सोलापूरच्या शेकडो मागांच्या गिरण्या आणि दुसऱ्या बाजूला कोष्ट्याचा पारंपारिक हातमाग, यांच्यामधला सुवर्णमध्य नाही का साधता येणार ? याचा विष्णुपंत गांभीर्याने विचार करु लागले. शोध घेता घेता रु. ७००० - ७५०० भांडवल गुंतवून तीन यांत्रिक माग घातले तर होणारा अत्पादनखर्च, घसारा, प्रत्यक्ष विक्री, असा आराखडाच कागदावर मांडून खोलवर विचार केल्यावर त्याना अचानक जाणवले की बरोबर साडेतीन वर्षांत भांडवलाइतका नफा मिळू शकतो! मग ते सर्वाना आपला प्लॅन दाखवत सुटले. तज्ञांचे म्हणणे की ताणा पाजणीचे काम कसे करणार? शंभर मागांना पुरणारे ताणा पाजणीचे यंत्र, केवळ तीन मागांसाठी कसे काय फायदेशीर ठरणार? विचार करता करता विष्णुपंतांच्या डोक्यात लाकडी बीम तयार करण्याची कल्पना आली. छोट्या छोट्या कारखान्याला ताणा पुरविणारी जी विलायती यंत्रे होती त्यांची ताण्याची वळकटी (ड्रम) ४८ ते ६० इंच व्यासाची होती. त्यावर ताणा करुन तो ताणा मागाच्या लोखंडी बीमावर घेण्याची पध्दत होती. मग विष्णुपंतानी त्यावर कल्पना लढवून ताण्याचे बीमच इतके लहान केले की ताण्याची व मागाची वळकटी एकच; त्यावर ताणा भरला की वईफणी करुन ती सरळ मागावर ठेवून कापड काढता यावे. त्यामुळे एक प्रोसेस वाचते. याच कल्पनेने दोन हातमागाचे पुढे तीन यांत्रिक माग झाले; (नंतर १६६ झाले तरी त्यानी याच लाकडी (बीमने) वळकटीने गजानन मिलमध्ये काम केले) याच सुमारास भांडवलाचा प्रश्न सुटला. म्हणजे विष्णुपंताचे श्वशूर श्री. भाऊराव अभ्यंकर यानी सोडवला. त्यानी आपल्या क्रेडिटवर त्यांचे सावकार श्री. भट यांचेमार्फत विष्णुपंताना भांडवलासाठी कर्ज मिळवून दिले. बंद पडलेला कारखाना, आता पुण्याला शेतकी कॉलेजनजीकच्या भट सावकारांच्या बंगल्याच्या कोपऱ्यात सुरू झाला. वास्तविक विष्णुपंतांना ही जागा पसंत नव्हती; कारण रेल्वे स्टेशन, मजुरांची वस्ती, मालविक्रीचे ठिकाण या सर्व महत्त्वाच्या बाबींपासून दूर अंतरावरची ही जागा गैरसोयीची होती. कारखान्याच्या अर्थकारणाला मारक होती. पण भांडवल मिळतेय आणि त्यामुळे कारखाना सुरु करता येतोय या एकमेव आनंदापोटी विष्णुपंतानी हा अपव्याप केला. परिणाम अर्थातच कारखाना नुकसानीत जाण्यात झाला. पुढे, 'भट सावकारांचे पैसे परत करा. माझी भागीदारी काढून घ्या' असा त्यांच्या श्वशुरांचा - अभ्यंकरांचा, तगादा मागे लागला.
सांगली आणि सांगलीकर................................................................. .९१