पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वास्तविक बडोद्याचा शिक्षणक्रम तीन वर्षाचा होता. पण तेथे फार मोठी यंत्रसामुग्री नव्हती; शिकायचे ते वर्षभरातच शिकून झाले. अगाच घरच्यांच्या पैशाचा का अपव्यय करा अशा विचाराने ते आपल्या लिंब गावी परतलेः थोड्या खिन्न मनानेच कारण घरच्या घरी हातमाग घालणे, सुताचा ताणा करणे, खळ देणे व अशा तऱ्हेने स्वतंत्रपणे कारखाना चालविणे, याबाबतीत फारसे शिकायला मिळाले नव्हते. अशा बेचैनीत असतानाच त्याना कोलकत्त्याच्या विणकाम शाळेचा पत्ता लागला. तेथे सुतापासून कापड तयार होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया शिकवल्या जातात असे कळल्यावर, घरच्यांच्या संमतीने आणि वडील बंधूंच्या आर्थिक पाठबळावर त्यानी कोलकत्ता गाठले. पण तेथेही कारखाना अभा करायला अपयोगी पडेल असे शिक्षण मिळणे कठीण दिसले तेव्हा वर्षभरातच ते गावी परतले. मग काही दिवस बेळगाव, रायबाग येथे चालणाऱ्या दोन-तीन कारखान्यांतून त्यानी प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेतले.
 त्या सुमारास लो. टिळकानी 'केसरी' मधून स्वदेशीचा पुरस्कार करताना महाराष्ट्रीय तरुणांनी स्वतंत्र अद्योगधंदे निर्माण करावेत असे आवाहन केले होते. त्यावेळी त्यानी परदेशी मालाची हकालपट्टी करण्यासाठी, तसल्या वस्तू निर्माण करणारे कारखाने येथे स्थापन झाले पाहिजेत असे आग्रहाने सांगितले होते. विष्णुपंत मोठे टिळकभक्त आणि स्वदेशाभिमानी होते. तेव्हा आपण एखादा स्वतंत्र अद्योग सुरु करावा अशी त्यांची जिद्द होती. १९०८ साली आपल्या लिंब गावीच दोन माग घालून विष्णुपंतानी कारखाना चालू केला. तो दिवस होता श्री गणेश चतुर्थीचा, म्हणून कारखान्याला नाव दिले श्रीगजाननमिल. दोन्ही माग बेळगाव - रायबागचे होते. एक जपानी पध्दतीचा तर दुसरा धावत्या धोट्याचा. विष्णुपंत स्वतः मागावर बसत. अकलाव करावा, ताणा करावा, वई-फणी करावी, कांडी भरावी अशी सगळी कामे ते स्वतःच करत. रोज १० तास मेहेनतीचे काम होई. गावातील लोक कौतुकाने बघायला येत. अत्साहाच्या भरात जो जे म्हणे तसले कापड - वस्त्र विष्णुपंत काढत. पंचे, कोटाचे कापड, कुणबाऊ धोतरजोडे, अंग पुसण्याचे टॉवेल वगैरे वगैरे. यात त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन होई; पण या प्रकारात नाना प्रकारचे सूत शिल्लक राही आणि त्यात भांडवल अडकून पडे. या प्रकारामुळे अद्योग गुंडाळण्याचीच नामुष्की पदरी आली. पण तेवढ्यात प्लेगची साथ आली. घर बंद करून दूर माळावर राहायला गेल्यावर आपोआपच माग बंद पडले. एकाच जातीचे कापड (पंचे तर पंचे, धोती तर धोतीच) काढले असते तर सुताचा वापर सुयोग्य तऱ्हेने झाला असता एवढे महत्त्वाचे व्यवहारज्ञान या खटाटोपातून झाले हेही नसे थोडके !
सांगली आणि सांगलीकर.................................................................... ९०