पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मारामाऱ्या होत. मग चिडवणाऱ्या मुलांपैकी मोठा मुलगा म्हणायचा " नुसती तक्रार, मारामारी नको. कुस्ती मारून न्याव (म्हणजे न्याय) करा.” कुस्त्या लागल्या की ब्राह्मणांची मुले धडाधड पडायची! हुर्यो व्हायची. ही गोष्ट इतरांच्या नाही पण विष्णुपंतांच्या मनाला फार लागली. तेव्हा दृढनिश्चयाने तालमीत जाऊन त्यानी व्यायामाला सुरुवात केली. दिवसें दिवस मेहनत केली. छोट्या मोठ्या कुस्त्या मारल्या तेव्हापासून ती जिंगरब्राह्मण मुलं पण त्याना मान देऊ लागली. एकंदरीत तो जातीपातीचा झगडा नव्हता ही गोष्ट विष्णुपंतांच्या लक्षात आली. व्यायामाचे माहात्म्य मात्र त्यानी तेव्हापासून जाणले. बलवान माणसाकडे कुणी डोळा वाकडा करुन बघू शकत नाही हे सत्य त्यांच्या लहानपणापासूनच मनावर ठसले. त्यामुळे शरीराची जोपासना त्यांनी आयुष्यभर एखादे खडतर व्रत अंगिकारावे तशी केली. शरीर सदैव स्वतःच्या 'स्वाधीन' ठेवले. ही शरीरसाधना अखेरपर्यंत त्याना अपयोगी पडली. कारखान्यात सदैव तासन् न तास खडतर काम करताना वृध्दापकाळातही त्याना कधी थकवा असा जाणवला नाही.
 इंग्रजी ५ वीपर्यंतचे त्यांचे शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पण शिक्षणाकडे त्यांचे फारसे लक्ष नसायचे. तालमीत घुमणे आवडायचे. वॉचमेकर, कारागीर यांच्याकडच्या यंत्रांबरोबर मात्र खेळत राहायला त्याना मनापासून आवडे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, घरच्या मंडळीनी त्यांना धंदेशिक्षणासाठी पाठवायचे ठरविले. विष्णुपंतानी शाळेला रामराम ठोकला. त्यांच्या मित्राना वाटले म्हणजे याला आता आयुष्यात नोकरी मिळणे कठीण! "अरेरे, आता तो बिचारा घिसाडी, सुतार किंवा कोष्टी होणार. वाईट झालं" त्या सुमारास 'केसरी' मध्ये बडोद्याच्या कला भुवनाची जाहिरात आली होती. त्या संस्थेत रंगशाळा, रसायनशाळा, शिल्पशाळा, चित्रशाळा असे धंदेशिक्षण देणारे विविध विभाग होते. विष्णुपंतानी बडोद्याला विणकामशाखेत प्रवेश घेतला. लहान वय, बडोद्यास घरच्या मंडळींपासून दूर एकटं राहायचं, शिक्षण कसं जमेल, अशा अनेक प्रकारच्या शंका मनात डोकावत होत्या; नववधूच्या मनात सासरी जाताना असतात तशा. पण विष्णुपंत हिय्या करुन गेले. ज्या ज्ञानावर भविष्यकाळात त्यानी मोठ्या कारखान्याचा इमला रचला त्या विणकामाचे प्राथमिक शिक्षण त्याना बडोद्यात मिळाले. विणकामासंबंधी शास्त्रीय माहिती मिळाली. प्रात्यक्षिके करायला मिळाली. गाठ कशी मारावी, तार कशी घ्यावी हे शिकून त्यांनी कोष्ट्याच्या घरी असतो तशा दोन धावत्या धोट्यांच्या मागांवर लंगोटीएवढे रुंद कापड काढत काढत टुवाल, किनारीतील रुईफुले, गोमी, करवती किनारी वगैरे नमुने मागावर काढण्याइतकी प्रगती केली. त्याचबरोबर दुर्बिणीतून नमुना कसा पहावा, त्यावरुन गणना करुन तत्सम नमुना कसा काढावा, हिशोब कसा करावा याचे पण ज्ञान घेतले.
सांगली आणि सांगलीकर................................................................... .८९