पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रीगजाननमिल जळून खाक झाली. शरमेची बाब म्हणजे हे सगळं मानव-निर्मित होतं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या विषारी प्रचारापोटी प्रक्षोभक गुंडांनी घातलेला तो नंगा नाच होता.
 सर्व स्थिरस्थावर झालं. लष्कराची मदत आली. दादासाहेबानी आपल्या सहकाऱ्यांसोबत दुसरे दिवशी जळलेली वास्तू बघितली. कारखान्याच्या आवारात सगळीकडे काळाच काळा रंग दिसत होता. बागेतील लहान लहान फुलझाडेच काय पण शंभर फुटांवरील झाडेही करपून गेली होती. घरावरील उंच पत्रे, कारखान्यावरील पत्रे भाजलेल्या पापडासारखे वाकडे-तिकडे झाले होते. मोठमोठे लोखंडी बीम पार वाकून मराठी 'ळ' इंग्रजी 'S' आकड्यासारखे वळलेले होते.
 खरं म्हणजे दातखीळ बसावी, पाहताक्षणीच वेडाचा झटका यावा, नैराश्यापोटी जीव द्यावा असं वाटायला लावणारी ती परिस्थिती होती. पण खऱ्या सोन्याची कसोटी अग्निसमोरच लागते! एका अदृश्य शक्तीने दादासाहेबांच्या देहात प्रवेश केला. समोर सुंदर ८०० ग्रंथ, वेदांताची टिपणे, गीतारहस्याचे टिपलेले सार जळून पडले होते; पण भगवत्गीतेचे चिंतन मनात सजग होते....." अश्नुते स हि कल्याणं व्यसने यो न मुह्यति ।" फिनिक्स पक्ष्याने राखेतून भरारी मारावी तशी किमया दादासाहेबानी केली. सगळी मरगळ झटकून टाकली. त्यांनी आणि सहकाऱ्यांनी कंबर कसली. अविरत श्रम सुरू झाले. जिद्दीने नित्य कामे सुरू झाली. श्रीगजाननमिल्सची कीर्तिध्वजा त्यांच्या आवडत्या टॉवरसारखी उंचावू लागली. सुवर्णतुला झालेले दादासाहेब, या अग्निपरीक्षेतून आणखीनच झळाळून निघाले.
 दादासाहेबांचे सगळे आयुष्य मुळी कसोट्या देण्यातच गेले. त्या दृष्टीने त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण जीवनपटच अलगडून पहायला हवा. चार आणे मजुरीवर काम करणाऱ्या सामान्य माणसाने, शेकडो कामगारांना भाकरी देणारा कारखानदार व्हावं, हा काही दैवी चमत्कार नव्हता तर यत्नदेवतेची ती अहर्निश पूजा होती. त्या पूजेचे फळ होते.
 दादासाहेबांचा जन्म ६जानेवारी १८८७ रोजी वेलणकर कुटुंबातील रामचंद्रपंत वेलणकर यांच्या कुटुंबात झाला. एकूण नऊ मुलांपैकी ते आठवे अपत्य. मूळ नाव विष्णू. साताऱ्याच्या उत्तरेस कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या 'कसबे लिंब' या गावात त्यांचे बालपण गेले. मराठी सातवीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. लहानपणी विष्णुपंत अगदी कृश होते. शाळेतील बिगरब्राह्मण मुलं जाता-येता, “जयदेव जयदेव, जय बामण भट्टा". अशी हात ओवाळून आरती केल्यासारखी त्यांची कुचेष्टा करीत तेव्हा त्याना आपल्या शारीरिक दौर्बल्याची जाणीव झाली. एकसारख्या भांडाभांडी,
सांगली आणि सांगलीकर................................................................... ८८