पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर
'सचोटी, चिकाटी व हातोटी यांचा त्रिवेणी संगम'



 रविवार, १ फेब्रुवारी १९४८ ची सकाळ. गांधीहत्येनंतर सांगली गावात सर्वत्र दंगल उसळली होती. मालमत्तेची होळी पेटली होती. कैफ चढलेली टोळकीच्या टोळकी रस्त्याने विध्वंसक कृत्ये करत, अर्वाच्य शिविगाळ करत हिंडत होती. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला सर्व पुजाऱ्यांची घरे पेटवण्यात आली होती; सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर याना धरुन त्यांचे हातपाय तोडल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. भयानक बातम्यांवर बातम्या कानांवर पडून सगळीकडे घबराट पसरली होती. कायदा आणि राजसत्ता लुळी पडल्याचे जाणवत होते; पोलिसफाटा असहाय्य दिसत होता. अशावेळी स्वत:च्या अिच्छेविरूद्ध, नातलगांच्या आग्रहापोटी, केवळ एका सदऱ्यावर घराबाहेर पडावे लागलेली, साठी अलटूनहि ताठ दिसणारी अक व्यक्ती, सांगली-मिरज रस्त्यावरील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसच्या गच्चीवर अभे राहून हताशपणे सांगलीच्या दिशेने पहात होती. अंगाची आग आग होत होती. नाडीचे ठोके जोरात पडत होते. नाका तोंडातून कढत श्वास बाहेर पडत होते. सतत चाळीस वर्षे खपून, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन अभी केलेली अद्योगवास्तू आगीच्या, मुद्दाम लावलेल्या, आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती. सुताच्या गाठी, रंगीत सुताचे गुदाम, रंगशाळा, कापड-गाठी, मोटारी, गॅरेज सर्व काही जळत होते. क्रूड ऑईलचे हौद पेटले. बेछूट जमाव दिसेल ते पेटवीत होता. श्रीकृपा बंगला, कापसाचे गोदाम, अभ्यागतगृह जळत होते. पेटवायला कंपौअंडमध्ये पडलेली जळाऊ लाकडे आयतीच दंगलखोरांच्या कामी आली होती.
 कधी न खचणारी पण त्या जीवघेण्या क्षणी विमनस्क झालेली व्यक्ति म्हणजे सांगलीचे अद्योगपती कै. अद्योगरत्न वि. रा. तथा दादासाहेब वेलणकर आणि आगीच्या ज्वाळात, निष्पाप सतीसारखी जळत असलेली ती वास्तू म्हणजे श्रीगजाननमिलची इमारत.
 नियती साप-शिडीचा पट कसा मांडून ठेवते पहा.
 अवघ्या १३ महिन्यापूर्वी म्हणजे १९ जानेवारी १९४७ ला दादासाहेब वैभवशिखरावर होते; दैवदुर्लभ अशी सुवर्णतुला थाटामाटात पार पडली होती; दृष्ट लागण्यासारखा सोहळा होता तो. आणि दुर्दैवाने केवळ वर्षभरात खरोखर दृष्ट लागली!
सांगली आणि सांगलीकर....................................................... .८७