पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "श्रीराम, जयराम, जयजयराम, सीताराम, राजाराम, मुनि - जनमानस - हंस परात्पर ।।धृ।। ही भवगंगा, कीर्तनगंगा, नवरस - गंगा, निववी अंगा ॥ १ ॥ ही रसधारा, परमोदारा, सौख्यागारा, कलिसि अतारा ॥२॥ ही जप-माला, हरिल भवाला, 'साधुदास' कवि देई हवाला ||३|| "
 सांगलीकर राजेसाहेबानी सोन्याचे कडे आणि 'राजकवि' हा किताब देऊन साधुदासाना गौरवलं होतंच, शिवाय तहहयात पेन्शनही दिली होती. कराड येथे भरलेल्या 'दक्षिण महाराष्ट्र साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते तर सांगली येथे भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असे थोडे मानमराबत त्याना मिळाले, तरी त्यांच्या अंगभूत प्रसिद्धीपराङमुखतेमुळे, आणि त्याकाळात पुण्या-मुंबईपासून दूर आडगावी असलेल्या सांगलीत राहण्याने, त्यांचा अदोअदो कमी म्हणजे फारच कमी झाला ही वस्तुस्थिती आहे.
 ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड साहित्यिक प्रिन्सिपल गोकाक यांचे काही काळ विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य म्हणून सांगलीत वास्तव्य होते. त्याना साधुदासांच्या गुणांची जाणीव होती. त्यानी एके ठिकाणी म्हटलय् की No citizen of Sangli can afford, not to know Sadhudas. If he can, he has missed one of the pleasures of life.
 प्रत्येक वाङमयप्रेमी सांगलीकराने हे आवर्जून लक्षात ठेवायला हवं! नाहीतर प्रारंभी अद्धृत केलेल्या प्रसंगातील, सांगलीकरासारखी त्याची अवस्था व्हायची!

●●●

सांगली आणि सांगलीकर................................................................... ८६