पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चरित्र साधुदासानी लिहिले आहे. 'मराठी भाषेची सजावट' हा त्यांचा मराठी व्याकरण आणि साहित्य याविषयी चपखल अदाहरणे देऊन सिद्ध केलेला अभ्यासपूर्ण ग्रंथ अितका आदर्श ठरला की मुंबई आणि नागपूर या दोन्ही विद्यापीठानी टेक्स्ट बुक म्हणून या पुस्तकाचे दोन्ही भाग लावले होते.
 साहित्यसेवेखेरीज साधुदासांच्या व्यक्तिमत्वात अनेक विलोभनीय पैलू होते. नुसतेच शिक्षक, कवि, कादंबरीकार नव्हते तर बैठ्या खेळांचे जाणकार खेळाडू होते. तबलापटू होते. रसिक संभाषणकार होते. त्यांच्या हास्य-विनोदानी गाजवलेल्या बैठकांची वर्णने आजहि जुने सांगलीकर चवीने करताना आढळतात. गंजिफा, फासे, पत्ते ते खेळतच; पण बुद्धिबळाचे ते नामवंत खेळाडू होते. एकाच वेळी आठ आठ खेळाडूंबरोबर ते खेळत आणि हमखास जिंकत. अनेक मोठ्या स्पर्धा त्यानी जिंकल्या होत्या. स्टेट प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीत असताना, ते बुद्धिबळाची इंग्रजी पुस्तके मागवून, त्यातील गाजलेल्या डावांचा बारकाईने अभ्यास करत. म्हणूनच त्यानी अधिकारवाणीने 'बुद्धिबळाचा मार्गदर्शक' असे एक छोटेखानी पुस्तक लिहिले. संगीततज्ञ प्रा. ग. ह. रानडे यांच्या 'संगीताचे आत्मचरित्र' या पुस्तकाला, त्यानी लिहिलेल्या मार्मिक प्रस्तावनेवरून, त्यांची संगीताची जाणकारी दिसून येते. स्वतः तबलापटू असल्याने, ताल आणि शीघ्रकवित्व यावरील त्यांचे विलक्षण प्रभुत्व दर्शविणारी एक सत्यकथा फार बोलकी आहे. साधुदास, कोटणीसमहाराजांच्या कीर्तनात, गाण्याची साथ करण्यास अभे रहात याचा अल्लेख वर आला आहेच. शिवरामबुवा गुरव नावाचे तबलजी साथीला बसत. ते वाजवणारे चांगले होते, पण साथीचे तारतम्य ओळखत नसत. मुख्य गाण्याला बाधा न आणणे ही गोष्ट महत्त्वाची. पण साथीच्या वेळी बोल-परणानी आणि तऱ्हेतऱ्हेच्या करामतीनी, कोटणीसमहाराजांना अनेकदा त्रास होई, “बुवा, साधा ठेका लावा" असे वारंवार सल्ले दिलेले असतानाह ऐन वेळी त्यांची गाडी घसरत असे. साधुदास स्वत: तबल्याचे अस्ताद. तेव्हा या शिवरामबुवाना थोडीशी 'चुणुक' दाखवावी, म्हणून एकदा कीर्तन चालू असतानाच, त्यानी 'सवारी' तालामध्ये, पंधरा मात्रांचे एक भजन तिथल्या तिथं रचून कोटणीसमहाराजांच्या परवानगीने स्वत:च म्हणायला सुरुवात केली. भजनाचा ताल काही केल्या शिवरामबुवांच्या ध्यानी येईना. ते बुचकळ्यात पडले. शेवटी ठेका लावता येईना म्हणून तबल्यावर हात ठेवून स्वस्थ बसले! मनोमन वरमले. गाणाऱ्यांची नेहमी करत तशी त्यांचीच कोंडी झाली. अर्थात् साधुदासानी नंतर ताल समजावून सांगितल्यावर, बुवानी ठेका लावला. गाण्याला मजा आली तो भाग वेगळा.

 ते उत्स्फूर्त रचलेले पद असे होते;


सांगली आणि सांगलीकर..................................................................... .८५