पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

“एकेकाळी सर्व हिंदुस्थानभर पसरलेले आमचे साम्राज्य आम्ही कोणत्या चुका करुन घालवले आणि स्वराज्यप्राप्तीकरता चाललेल्या सांप्रतच्या झगड्यात, आणि पुढे मिळणाऱ्या स्वराज्यात, पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न व्हावी ” अशा मुख्य हेतूने त्यांनी ऐतिहासिक कादंबरीलेखन केले. तसे त्यानी पहिल्या कादंबरीच्या प्रस्तावनेतच नमूद केले आहे. महाराष्ट्राच्या साम्राज्याचा आणि पर्यायाने हिंदुस्थानचा १७६७ पासून १८१८ पर्यंतचा म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कालापासून ते पेशवाईचा अस्त होईपर्यंतच्या काळाचा इतिहास त्याना कादंबरीच्या माध्यमातून एकूण १६ भागात सांगायचा होता. दुर्दैवाने त्यापैकी तीनच कादंबऱ्या पूर्ण होऊ शकल्या. पहिल्या 'पौर्णिमा' या कादंबरीत, श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या काळातील, मराठ्यांच्या ऐन अत्कर्षाचे कथानक आहे. 'मराठेशाहीचा वद्यपक्ष प्रतिपदा' या कादंबरीत, हैदरअलीला पेशव्यानी नेस्तनाबूत केले त्याची हकीकत आहे; तर 'द्वितीया' या तिसऱ्या कादंबरीत श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या दहा महिन्यांच्या दुर्दैवी कारकीर्दीचे चित्रण आहे. ऐतिहासिक सत्याचे अचूक भान, चित्तवेधक लेखनशैली, अत्तम स्वभावचित्रणे, प्रत्ययकारी वर्णने, यामुळे या कादंबऱ्या अत्यंत वाचनीय झाल्या आहेत. जुन्या चालीरीती, वस्त्रभूषणे, तत्कालीन खेळ करमणुकी, जुने वाक्प्रचार या सर्वांची साधुदासाना अत्तम माहिती असल्याने, कादंबरीतील प्रसंगात वाचक गुंगून जातो. नुसत्या दागिन्यांच्या आणि जेवणावळींच्या वर्णनाने दिङ्मूढ होतो. सोन्याचे दागिने इतक्या विविध प्रकारचे असतात हेच आधी कुणाला माहीत नसते! साधुदास दागिन्यांची माहिती करुन घेण्यासाठी एका म्हाताऱ्या सोनाराकडे हेलपाटे घालत. हत्तीच्या अंगावरील साजाची माहिती करून घेण्यासाठी, माहुताशी मैत्री जोडत. ता न तास निरीक्षण करीत. अशा प्रयत्नांमुळे कादंबरीतील वर्णने हुबेहुब वठत. साधुदासानी कादंबऱ्यातून रेखाटलेले, शनिवारवाड्याचे वर्णन अस्सल आहे, असे शिफारसपत्र अनेक तज्ञांनी दिलेले आहे.
 अेवढ्या ताकदीची कादंबरीमाला पूर्ण न व्हावी हे रसिकांचेच दुर्दैव होय. एरवी हरिभाऊ, नाथमाधव यांच्या बरोबरीने साधुदासांचे नाव ऐतिहासिक कादंबरीच्या बाबतीत घेतले गेले असते.
 काव्य आणि कादंबरी याखेरीज साधुदासानी आणखीही गद्य लेखन केलं आहे. 'राजसेवा' या नावाचं एक नाटक त्यानी लिहिलं होतं. पण पहिल्याच प्रयोगात, एका तत्कालीन बदफैली राजाशी साम्य आढळल्यामुळं, प्रेक्षकांमध्ये हुल्लड माजली आणि पहिलाच प्रयोग अखेरचा ठरला!

 आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या तात्यासाहेब कोटणीसमहाराजांचे अत्यंत रसाळ


सांगली आणि सांगलीकर.................................................................. ८४